नेरळ : कर्जत तालुक्यातील नेरळ विविध विकास कार्यकारी सहकारी सोसायटीच्या माध्यमातून नेरळ येथे आधारभूत भात खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. या आधारभूत भात खरेदी केंद्राचा फायदा हा नेरळ व आजूबाजूचे गाव परिसरातील शेतकऱ्यांना होणार असल्याने, या भागातील शेतकऱ्यांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह फेडरेशन लिमिटेड आणि जिल्हा पणन कार्यालय यांच्या माध्यमातून रायगड जिल्हयातील कार्यरत असलेल्या आधारभूत भात खरेदी केंद्रास परवानगी देण्यात आल्याप्रमाणे नेरळ विविध विकास कार्यकारी सोसायटी यांना हे आधारभूत भात खरेदी केंद्र यांच्या माध्यमातून भाताची खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. नेरळ पोस्ट ऑफिस येथील शासकीय महसूल गोदामामध्ये नेरळ विविध विकास कार्यकारी सोसायटीचे आधारभूत भात खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे.
सदर भात खरेदी केंद्राची सुरवात करते प्रसंगी नेरळ विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र विरले यांच्या हस्ते विक्रीसाठी आलेल्या भाताच्या पोत्याचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सोसायटीचे उपाध्यक्ष रवींद्र झांजे यांनी वजनकाट्याचे पूजन केले, तर संचालक शशिकांत मोहिते आणि यशवंत कराळे यांनी श्रीफळ वाढवला. यावेळी शरद देशमुख, दिलीप शेळके आदी उपस्थित होते.
भाताचा आधारभूत दर हा अ- वर्ग सधारण 2,369 , ब- वर्ग अ दर्जा 2,389 असा आहे. नेरळ विविध कार्यकारी सोसायटी हद्दीत एकूण 60 गावांचा समावेश येत आहे. या गावांमधील एकूण 550 शेतकऱ्यांनी आपल्या भाताची विक्री करण्यासाठी नोंदणी व भाताची विक्रीसाठी शेतकऱ्यांना दि. 31 मार्चपर्यंत मुभा देण्यात आली आहे.राजेंद्र विरले, अध्यक्ष, नेरळ सोसायटी.