नेरळ: पहिल्या पावसाच्या आगमनाने लहान मुलांमध्ये आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असले, तरी अवघ्या २० मिनिटांच्या मुसळधार पावसाने नेरळ ग्रामपंचायत प्रशासनाच्या मान्सूनपूर्व तयारीच्या दाव्यांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. शहरातील अनेक रस्ते आणि परिसर जलमय झाल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला.
ग्रामपंचायतीने सुमारे पाच लाख रुपयांचे टेंडर काढून नालेसफाई, गटार स्वच्छता आणि मान्सूनपूर्व कामे केल्याचा दावा केला होता. मात्र, पहिल्याच पावसात शहराची दयनीय अवस्था समोर आल्याने हे पैसे नेमके कुठे खर्च झाले, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
नेरळ ते पाली येडोबा मंदिर परिसरातील रस्ता नेहमीप्रमाणे पाण्याखाली गेला. जुनी बाजारपेठ परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. बंदिस्त गटारे आणि नाल्यांची वेळेत सफाई न झाल्याचे चित्र या भागात स्पष्टपणे दिसून आले.
खांदा परिसरात पावसाचे पाणी थेट घरांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. तसेच शेवाळे रुग्णालयाकडे जाणारा पादचारी मार्ग पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने रुग्ण आणि नातेवाईकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
रस्त्यांची वाढवलेली उंची, अनियंत्रित बांधकामे आणि अरुंद झालेले नाले यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यांवर आणि नागरिकांच्या घरांमध्ये शिरत असल्याचे दिसून आले.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही अवघ्या २० मिनिटांच्या पावसात शहर जलमय होत असेल, तर मान्सूनपूर्व कामांचा दर्जा नेमका काय होता? नालेसफाई प्रत्यक्षात झाली होती की केवळ कागदोपत्री दाखवण्यात आली, असा प्रश्न आता जोर धरू लागला आहे.
मूलभूत समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे...
रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या नेरळ ग्रामपंचायतीची कार्यपद्धती पहिल्याच पावसात उघड झाली असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. ग्रामपंचायतीच्या कारभारावर सातत्याने प्रश्न उपस्थित करणाऱ्या लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने आता वास्तव परिस्थितीची दखल घेऊन नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.
पाच लाखांचे टेंडर, मान्सूनपूर्व कामांचे दावे आणि अवघ्या २० मिनिटांच्या पावसात रस्ते जलमय ; नेरळकरांच्या पैशांचा हिशोब कोण देणार? "असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे.
२० मिनिटांच्या पावसात रस्ते जलमय...
पाच लाखांचे टेंडर, मान्सूनपूर्व कामांचे दावे आणि अवघ्या २० मिनिटांच्या पावसात रस्ते जलमय ; नेरळकरांच्या पैशांचा हिशोब कोण देणार? "असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे.