Matheran Mini Train pudhari photo
रायगड

Matheran Tourism : मिनी ट्रेनच्या अपुऱ्या फेऱ्यांमुळे माथेरानचे पर्यटक घटले

नेरळ ते माथेरानदरम्यान फक्त दोन फेऱ्या; रेल्वे सेवा तोट्यात असल्याचे कारण; ऐतिहासिक टॉय ट्रेनचे आकर्षण

पुढारी वृत्तसेवा

माथेरान : मिलिंद कदम

नेरळ-माथेरान मिनी ट्रेन सफारीकरिता देश विदेशातून अनेक पर्यटक येत असतात. हेरिटेज दर्जा प्राप्त असलेली माथेरानचे वैभव असणारी मिनी ट्रेनच्या अपुऱ्या फेऱ्यांमुळे पर्यटकांमध्ये नाराजी आहे. याचा माथेरानच्या पर्यटनावर परिणाम होत आहे. या फेऱ्यांच्या संख्येमध्ये तातडीने वाढ व्हावी अशी मागणी माथेरानमध्ये येणारा प्रत्येक पर्यटक करीत आहे.

माथेरानची पर्यटन जीवनवाहिनी ही मिनी ट्रेन आहे. येथे अनेक वर्षांपासून सातत्याने येणाऱ्या पर्यटकांच्या अनेक गोड आठवणी या मिनी ट्रेनच्या सफरीशी जोडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळेच आपल्या मुलांसह ही सफर पुन्हा करण्याकरता अनेक पर्यटक मात्र मध्ये येत असतात परंतु नेरळ-माथेरान दरम्यान सकाळच्या वेळी फक्त दोनच फेऱ्या सुरू असल्याने या पर्यटकांचा हिरमोड होत असतो.

काही वर्षांपूर्वी नेरळ-माथेरान दरम्यान पाच ते सहा मिनी ट्रेन धावत असत, ज्यामध्ये संध्याकाळी सात वाजता येथे वस्ती करता ही एक ट्रेन येत असे परंतु आता फक्त दोनच ट्रेन रेल्वे प्रशासनाने या मार्गावर सुरू ठेवल्या आहेत. ही सेवा तोट्यात असल्याचे कारण नेहमीच पुढे केले जाते परंतु तोट्यात असलेल्या रेल्वेच्या सध्या सुरू असलेल्या कामांकरिता रेल्वे प्रशासन कोट्यावधी रुपये खर्च करत आहे परंतु हे पैसे मिनी ट्रेनचे डबे किंवा इंजिनान करिता नसून बांधकामांवर हा खर्च केला जात आहे त्यामुळे या खर्चा बाबत प्रश्नचिन्ह उभे राहते.

मिनी ट्रेनच्या फेऱ्या कमी झाल्यामुळे माथेरानमधील लॉजिंग व्यवसायिकानाही त्याचा फटका बसला असून थेट गावांमध्ये पर्यटक येत असल्याने त्यांना चांगला व्यवसाय मिळत असे परंतु आता मिनी ट्रेनच्या फेऱ्या कमी असल्याने हे पर्यटक विखुरले गेले आहेत त्याचप्रमाणे याचा थेट फटका नेरळ मात्र घाटावरती होत असून घाटामध्येही ट्रॅफिक जाम होत असते तर दस्तुरी नाका येथेही वाहन तळ येथे वाहनाने जागा मिळत नाही.

मिनी ट्रेन बंद झाल्यापासून याचे प्रमाणात दिवसेंदिवस वाढत आहे पूर्वी लोक नेरळ येथे गाडी पार्क करून माथेरान मिनी ट्रेनने वर येत असत, ज्यामुळे दस्तुरी नाका प्रवेशद्वार येथे गर्दी कमी होती.

कर्मचाऱ्यांची उदासिनता

नेरळ-माथेरान मिनी ट्रेनच्या फेऱ्या वाढवाव्यात याकरता कर्मचारी उदासीन दिसत असतात कारण माथेरानमध्ये स्टाफ क्वार्टर असतानाही एकही कर्मचारी राहत नसून संध्याकाळी शेवटची गाडी येताच सर्व कर्मचाऱ्यांचे नेरळमध्ये जाण्याकरता धावपळ सुरू असल्याचे चित्र या ठिकाणी नेहमीच पहावयास मिळते, त्यामुळे संध्याकाळच्या ट्रेन सेवे करिता कर्मचारी आग्रही नसल्याचे स्थानिकांमधून बोलले जात आहे.

घाट रस्त्यावर पर्यटकांचा वाढता भार

निसर्गरम्य वातावरण, हिरव्यागार डोंगररांगा, धुक्याची चादर, उंच कडे, खोल दऱ्या आणि प्रदूषणमुक्त वातावरण यामुळे माथेरान पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ बनले आहे. उपलब्ध नगरपरिषद आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये माथेरानला तब्बल १० लाख १८ हजार ४३२ पर्यटकांनी भेट दिली. त्यामुळे माथेरानमध्ये वर्षाकाठी साधारण दहा लाख पर्यटक येत असतात. मात्र याचा घाटरस्त्यावर मोठा भार येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT