Raigad Tree Cutting pudhari photo
रायगड

Raigad Tree Cutting : साई डोंगरातील वृक्षतोडीवरून विरोधक आक्रमक

‘एक झाड आईच्या नावाने’ घोषणेवरून टोला; वृक्षतोडीच्या निषेधार्थ काँग्रेसकडून वृक्षारोपण; लवकरच न्यायालयात जाण्याचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

नेरळ : ‘विकासाला आमचा विरोध नाही; मात्र विकासाच्या नावाखाली जंगलाचा विनाश आम्हाला मान्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक पेड़ माँ के नाम’ या अभियानांतर्गत, एका बाजूला झाडे लावण्याचे आवाहन केले जाते आणि दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्वी ३३ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प केला होता.

ती झाडे नेमकी कुठे लावली, याचा महाराष्ट्राला हिशेब द्यावा. त्यांनी या वृक्षलागवडीसंदर्भात श्वेतपत्रिका जाहीर करण्याची मागणी करत, लवकरच आम्ही या प्रकरणी न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगून, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

कर्जत तालुक्यातील साई डोंगर परिसरातील टोरंट पॉवरच्या प्रस्तावित उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी सुरू झालेल्या वृक्षतोडीचा मुद्दा आता राजकीयदृष्ट्या तापला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गुरुवारी साई डोंगर परिसराची पाहणी करून स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधला.

आम्ही वृक्ष लावतोय, तुम्ही तोडत आहात

वृक्षतोडीच्या निषेधार्थ काँग्रेसकडून साई डोंगर परिसरात प्रतीकात्मक वृक्षारोपण करण्यात आले. या झाडाची देखभाल स्थानिक वनहक्क समितीचे अध्यक्ष आणि उपसरपंच यांनी करण्याची जबाबदारी स्वीकारल्याचे सपकाळ यांनी सांगितले, आम्ही निर्माण करण्याची भूमिका घेत आहोत, तर सरकार विनाशाच्या दिशेने जात असल्याचा आमचा आरोप आहे. म्हणूनच वृक्षतोडीच्या निषेधार्थ आम्ही येथे झाड लावत आहोत असेही ते म्हणाले.

टोरंटला लाभ देण्यासाठी प्रकल्प?

प्रकल्पामागील निर्णयप्रक्रिया, परवानग्या आणि आर्थिक हितसंबंध यांची चौकशी करण्याची मागणी करत सपकाळ यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. टोरंट कंपनीला प्रकल्पासाठी मिळालेल्या परवानग्या आणि त्यामागील निर्णयप्रक्रियेबाबत सरकारने स्पष्टता द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. भाजपला उद्योगांकडून मिळालेल्या आर्थिक देणग्या आणि त्यानंतर विशिष्ट प्रकल्पांना मिळणाऱ्या सरकारी परवानग्यांमध्ये काही संबंध आहे का, याचाही खुलासा व्हावा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

३२ हजार ४९० झाडे तोडण्यास वन विभागाची परवानगी

साई डोंगर-१ प्रकल्पासाठी सुमारे ३२ हजार ४९० झाडे तोडण्यास वन विभागाची परवानगी असल्याचे समोर आले आहे. प्रकल्पाची क्षमता ३,००० मेगावॉट असून प्रकल्पासाठी सुमारे १३,५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे, भीमाशंकर अभयारण्यात टोरंट प्रकल्पासाठी कोणतीही अवैध वृक्षतोड सुरू नसल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच प्रकल्प परिसरात आणि वन विभागामार्फत मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड प्रस्तावित असल्याचेही विभागाने सांगितले असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.

सरकारी जमिनींच्या वापराचा खुलासा करा

साई डोंगर परिसरातील वनजमिनी, स्थानिक ग्रामस्थांचे हक्क आणि पर्यावरणीय परिणाम याबाबत सरकारने पारदर्शक भूमिका जाहीर करावी, अशी मागणी सपकाळ यांनी केली. ग्रामपंचायतींचे ठराव, वनहक्क समिती आणि स्थानिक नागरिकांना विश्वासात घेण्याच्या प्रक्रियेबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. आमची स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा झाली असून, त्यांच्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस या आंदोलनात सहभागी झाली आहे. हा लढा केवळ प्रतीकात्मक राहणार नाही. काँग्रेस पक्षाच्या वतीने लवकरच न्यायालयात याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे सपकाळ यांनी बोलताना स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT