Raigad Encroachment Issue
महाड: स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर परंपरागत राहत असलेल्या धनगर समाजाच्या वस्तीला केंद्रीय पुरातत्त्व विभागाने अतिक्रमण हटाव मोहिमे अंतर्गत नुकत्याच गड सोडण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. याचा सर्व स्तरावरून निषेध व विरोध होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या युवती राष्ट्रीय अध्यक्षा सक्षणा सलगर यांनी आज (दि. १५) किल्ले रायगडावर दाखल होत छत्रपती शिवरायांना अभिवादन करून गडावरील धनगर समाजाची भेट घेतली.
यावेळी त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्यासमवेत पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि त्यांच्या पत्नी कुमुदिनी चव्हाण यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गडावरील धनगर समाजाच्या व्यथा जाणून घेतल्यानंतर गडउतार होताच त्यांनी महाड शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेतून सरकारवर निशाणा साधला. सरकारला फक्त किल्ले रायगडावरील अतिक्रमण दिसते का? धनगर समाजाबाबत केलेली ही खेळी ही खोड कोणाची आहे? असा खडा सवाल उपस्थित केला.
धनगर समाज हा पिढ्यान पिढ्या पारंपरिक पद्धतीने गडावर वास्तव्यास असून येणाऱ्या पर्यटकांना आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून चहा, नाश्ता, भोजन, शीतपेय व अन्य प्रकारची सेवा उपलब्ध करून देत आहेत. त्याचबरोबर गडस्वच्छता, गडसेवा देखील करीत आहेत.
आम्हाला सरकारचा बंगला नको, जागा नको, आम्हाला रायगडावरच्या मातीवरच राहायचे आहे, अशी धनगर समाजाची भूमिका असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. असून गडावरील धनगर समाजाच्या ज्येष्ठ महिला शांताबाई शिंदे यासह गाईड म्हणून काम करणाऱ्या तरुणांनी देखील सरकारने अचानकपणे आम्हाला या नोटिसा बजावल्या असल्याची माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले.
एक धनगर समाजाची मुलगी म्हणून तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची युवती राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून गेली अनेक वर्ष काम करीत आहे. धनगर समाजाच्या बाबतीत ही खेळी ही खोडी कोणाची? असा सवाल त्यांनी यावेळी सरकारला केला आहे. एकंदरीत किल्ले रायगडावरील धनगर समाजासाठी सर्व स्तरावरून पाठिंबा मिळताना दिसत असून आता पुरातत्त्व विभागाने बजावलेल्या नोटीशीबाबत केंद्र सरकार आणि राज्य सरकार काय भूमिका घेते?, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.