

Astrolabe Found In Raigad | Saumyayantra Discovery |Raigad Fort Excavation
दुर्गराज रायगडावर भारतीय पुरातत्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या उत्खननात एक अत्यंत महत्वाचे ऐतिहासिक खगोलशास्त्रीय उपकरण सापडले आहे. या यंत्राला 'यंत्रराज' किंवा 'सौम्ययंत्र' (Astrolabe) असे म्हणतात. या शोधामुळे रायगडाच्या बांधकामात तत्कालीन अत्याधुनिक व शास्त्रशुद्ध पद्धतींचा वापर झाल्याचे स्पष्ट होत आहे.
छत्रपती संभाजीराजे यांनी स्वतः त्यांच्या फेसबुक पोस्टद्वारे या ऐतिहासिक शोधाची माहिती दिली आहे. त्यांनी नमूद केले की, दुर्गराज रायगडाचे बांधकाम खगोलशास्त्राचा अभ्यास करून, अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आले होते, याचा हा पुरावा आहे.
Astrolabe हे प्राचीन खगोलशास्त्रीय उपकरण असून त्याचा वापर ग्रह-ताऱ्यांचा अभ्यास, दिशा निश्चिती, आणि वेळ मोजण्यासाठी केला जात असे. याला ‘यंत्रराज’ म्हणूनही ओळखले जाते. अक्षांश, रेखांश, कर्कवृत्त, विषुववृत्त यांसारख्या खगोलशास्त्रीय गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी हे यंत्र उपयुक्त ठरत असे. रायगडाच्या बांधकामावेळी हे यंत्र वापरले गेले असण्याची शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
मागील तीन ते चार वर्षांपासून रायगड किल्ल्याच्या विविध भागांमध्ये उत्खननाचे कार्य सुरू आहे. रोपवे अप्पर स्टेशनच्या मागील भागापासून कुशावर्त तलाव आणि बाजारपेठेपासून जगदीश्वर मंदिरापर्यंत सुमारे १० ते १२ ठिकाणी शिवकालीन वाड्यांचे अवशेष उघड करण्यात आले आहेत.
याच उत्खननादरम्यान, कुशावर्त तलावाच्या वरील भागात आणि वाडेश्वर मंदिराजवळील एका वाड्याच्या जागेवर हे सौम्ययंत्र सापडले आहे.
या यंत्राच्या वरच्या भागावर काही कोरलेल्या अक्षरांचे तसेच कासव किंवा सापासारख्या प्राण्यांचे अंकन आढळून आले आहे. प्राण्यांचे तोंड व शेपटीच्या दिशांवरून उत्तर आणि दक्षिण दिशा निश्चित करण्यास मदत होत असावी, असा अभ्यासकांचा अंदाज आहे. त्यामुळे या यंत्राचा उपयोग दिशा ठरवण्यासाठीही होत असावा.
हा ऐतिहासिक ठेवा अभ्यासकांसाठी अत्यंत मौल्यवान असून, या आधारावर भविष्यातील संशोधनाला नवीन दिशा मिळू शकते.