नेवाळी : नवी मुंबई महापालिकेत समाविष्ठ 14 गावांतील प्रदूषणाची समस्या गंभीर आहे. शुक्रवारी येथील नाल्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडले होते. त्याचा उग्र वास येत असताना शनिवारी माळरानांवर घातक रसायनांची होळीही सुरू होती. निघू-बामल्ली दरम्यानचा हा प्रकार दैनिक पुढारीने चित्रीत केला आहे.
या 14 गावांमध्ये केमिकल माफियांचे हैदोस सुरूच आहे. ठाकूरपाडा डोंगर त्यांना आंदण दिला आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. डोंगरावर सर्रास रासायनिक पदार्थ जमिनीत गाडले जात आहेत. तर उघड्यावर देखील जाळण्याचे सत्र सुरू आहे. मात्र प्रदूषण नियंत्रण महामंडळासह महसूल विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. परिसरात दिवसरात्र घातक रसायनांची होळी करणार्या टोळ्या सक्रिय आहेत. तर डोंगरावर असणार्या खदानमध्ये देखील प्रदूषणाचे अड्डे तयार करण्यात आले आहेत.