Bribe News Pudhari
रायगड

RTO Bribery Case: रिक्षा परमिटसाठी ४५०० रुपयांची लाच; नवी मुंबईत RTO एजंट ACBच्या जाळ्यात

तक्रारदार हे ३७ वर्षीय असून ड्रायव्हिंग स्कूलचा व्यवसाय करतात.

पुढारी वृत्तसेवा

पनवेल: रिक्षा परमिट नावावर करण्याच्या कामासाठी शासकीय शुल्काव्यतिरिक्त स्वतःसाठी व लोकसेवकाच्या नावाने ४ हजार ५०० रुपयांची लाच मागून ती स्वीकारणाऱ्या विलास गणपती सनगर या आरटीओ एजंटला नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी रंगेहाथ पकडले.

तक्रारदार हे ३७ वर्षीय असून ड्रायव्हिंग स्कूलचा व्यवसाय करतात. त्यांच्याकडे असलेल्या अधिकारपत्रानुसार रिक्षा परमिट नावावर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह ते आरटीओ एजंट विलास सनगर यांच्याकडे गेले होते. यावेळी त्यांनी रिक्षा परमिट नावावर करण्यासाठी लागणाऱ्या शुल्काबाबत विचारणा केली.

सनगर यांनी शासकीय शुल्क २५ हजार ७०० रुपये असल्याचे सांगितले. त्याशिवाय स्वतःसाठी तसेच लोकसेवकाच्या नावाने ४ हजार ५०० रुपयांची लाच द्यावी लागेल, अशी मागणी केल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रारदाराने ११ ऑगस्ट २०२६ रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली.

नवी मुंबई लाच लुचपत विभागाच्या पथकाने लाचेच्या मागणीची पडताळणी केली. या पडताळणीदरम्यान सनगर यांनी तक्रारदाराकडे लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

एसीबीने मंगळवारी खारघर आरटीओ कार्यालयासमोर सापळा रचला. दुपारी १ वाजून ५६ मिनिटांनी पंचांसमक्ष तक्रारदाराकडून ४ हजार ५०० रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना सनगर यांना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT