विक्रम बाबर
पनवेल : देशातील सर्वांत चर्चेत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (NMIAL) आज पहिली संपूर्ण-प्रमाणात एकात्मिक प्रवासी चाचणी यशस्वीरित्या पार पडली. या चाचणीमुळे २५ डिसेंबर रोजी होणाऱ्या विमानतळाच्या अधिकृत उड्डाणाच्या सुरूवातीसाठीची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या बद्दलची अधिकृत माहिती नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या "x " वर अधिकृत व्हिडिओ टाकून दिली आहे.
विमानतळाच्या Operational Readiness and Airport Transfer (ORAT) टीमच्या मार्गदर्शनाखाली ही चाचणी पार पडली. शेकडो सिम्युलेटेड (प्रात्यक्षिक) प्रवाशांनी सहभागी होत संपूर्ण प्रवासी प्रक्रियेचा अनुभव घेतला. चेक-इनपासून सुरक्षा तपासणी, बोर्डिंग, ते बॅगेज रिक्लेमपर्यंत प्रत्येक टप्प्याची काटेकोर आणि वास्तव परिस्थितीप्रमाणे चाचणी घेण्यात आली.
इंडिगो, अकासा आणि एअर इंडिया एक्सप्रेस या तीन विमान कंपन्यांनी या चाचणीत सक्रिय सहभाग नोंदवला. प्रवाशांची वाहतूक, सुविधा, कर्मचारी सज्जता, तांत्रिक बाबी, यंत्रणांची अचूकता आणि आपत्कालीन व्यवस्थापन अशा प्रत्येक घटकाचा ORAT टीमने बारकाईने आढावा घेतला.
CISF आणि विविध विभागांची टीम सज्ज
विमानतळावरील सुरक्षेची धुरा हाती असलेल्या CISF दलाने सुरक्षा तपासणीत आपली उत्कृष्ट कार्यक्षमता पुन्हा अधोरेखित केली. प्रवासी तपासणी, सामान स्कॅनिंग आणि नियंत्रण कक्षातील प्रतिसाद प्रणालींची देखील तपासणी करण्यात आली.
दरम्यान विमानतळ विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या L&T सह NMIAL च्या सर्व विभागांनी समन्वयातून ही चाचणी गतीमान आणि यशस्वी केली. विमानतळावरील सर्व सेवा विभाग, कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी या उपक्रमात सहभागी होत विमानतळाच्या प्रत्यक्ष ऑपरेशन्सची तयारी सिद्ध केली.
ख्रिसमससोबत नव्या स्वप्नाचे उड्डाण होणार
नाताळाच्या शुभदिनी नवी मुंबई या शहराला भव्य भेट मिळणार आहे. पहिल्या उड्डाणासाठी विमानतळ पूर्ण सज्ज असून, सर्व आधुनिक सुविधा आणि सुलभ प्रवासाचा अनुभव प्रवाशांना मिळणार आहे. या विमानतळाच्या सुरूवातीमुळे मुंबई–नवी मुंबई परिसरातील आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीला नवे बळ मिळणार असून, प्रवाशांना पर्यायी आणि उच्च-स्तरीय प्रवासी सुविधा मिळणार आहेत.