पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मार्गावर दुपारी चार वाजण्याच्या आसपास झालेल्या पहिल्याच अपघाताने परिसरात खळबळ उडाली. नव्याने तयार झालेल्या या मार्गावर बेफाम वेगाने जाणाऱ्या तीन गाड्या एकमेकांना जोरदार धडक देत अपघातग्रस्त झाल्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र सर्व गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल शहरा कडून विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून वेगाने जाणाऱ्या एका कारने समोरून येणाऱ्या टेम्पोला जोरदार धडक दिली. धडकेचा आवाज एवढा मोठा होता की आसपासच्या नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्या क्षणी मागून येणारी आणखी एक कार या अपघातग्रस्त वाहनांना येऊन धडकली आणि त्यामुळे तिन्ही वाहने एकमेकांवर आदळली.
अपघात एवढा विचित्र आणि भीषण होता की, या मध्ये छोटा टेम्पो रस्त्यातच पलटी झाला त्या मुळे काही वेळ रस्ता पूर्णतः बंद झाला होता. स्थानिक रहिवाशांनी व वाहनचालकांनी तत्काळ बचावकार्य सुरू करून जखमी टेम्पोचालकाला बाहेर काढले. त्याला किरकोळ दुखापत झाली असून उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सध्या या अपघाताची नोंद संबंधित पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, अपघाताचे कारण तपासले जात आहे.
नव्याने उभारल्या जाणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मार्गावर हा पहिलाच अपघात असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात बांधकाम साहित्य, वाहनांची वाहतूक सुरू असते. त्यामुळे वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
या घटनेमुळे विमानतळ मार्गावरील सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिकाऱ्यांनाही सजग राहावे लागणार आहे. सुरुवातीच्या तपासानुसार, वेग आणि बेफिकिरी हे या अपघातामागचे मुख्य कारण असल्याचे प्राथमिक निष्कर्ष समोर येत आहेत.