ST Bus File Photo
रायगड

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळावर जाणे झाले सोपे! दादर, सीएसएमटी, बोरिवली अन् पुण्याहून थेट एसटी बस

एसटी महामंडळाची सेवा सुरू; मुंबईसह महाराष्ट्रातील प्रवाशांना विमानतळासाठी किफायतशीर सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय

पुढारी वृत्तसेवा

पनवेल: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणखी मजबूत झाली असून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दादर,सीएसएमटी, बोरिवली आणि पुण्यासाठी थेट बससेवा सुरू केली आहे.

त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशासह महाराष्ट्रातील विविध भागांतील प्रवाशांना विमानतळावर ये-जा करण्यासाठी किफायतशीर आणि थेट सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्याहस्ते दादर बसस्थानकावर या बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी व एसटीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विमानतळावर दाखल झालेल्या बसचे विमानतळाच्या डिपार्चर फोरकोर्टवर स्वागत करण्यात आले.

पहिल्या टप्प्यात २६ फेऱ्या

पहिल्या टप्प्यात नवी मुंबई विमानतळ-दादर आणि सीएसएमटी मार्गावर दररोज एकूण १६ फेऱ्या, बोरिवलीसाठी ८ फेऱ्या, तर पुण्यासाठी २ फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. या सेवांसाठी अटल सेतूसह मुंबईतील प्रमुख मार्गांचा वापर करण्यात येणार आहे.

नवी मुंबई विमानतळ -सीएसएमटी-दादर मार्ग : उलवे, न्हावा-शेवा, चिर्ले, अटलसेतू, शिवडी, ईस्टर्न फ्रीवे, भायखळा, परळ आणि लालबागमार्गे बससेवा.

नवी मुंबई विमानतळ-बोरिवली मार्ग : अटल सेतू, ईस्टर्न फ्रीवे, ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे, सायन, मुंबई विमानतळ टर्मिनल-१,जेव्हीएलआर, अंधेरी आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेमार्गे बससेवा. नवी मुंबई विमानतळ-पुणे मार्ग : पुण्यातील स्वारगेटपर्यंत थेट बससेवा उपलब्ध होणार आहे.

भाडेही परवडणारे

विमानतळ ते बोरिवली बसभाडे २१० रुपये, विमानतळ ते दादर १७० रुपये, तर विमानतळ ते पुणे स्वारगेट प्रवासासाठी ४५५ रुपये भाडे आकारले जाणार आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, नवी मुंबई हे महाराष्ट्राच्या विकासाला व जागतिक कनेक्टिव्हिटीला महत्त्वपूर्ण योगदान देणारे विमानतळ आहे. एसटीच्या व्यापक वाहतूक नेटवर्कशी विमानतळाला जोडल्यामुळे मुंबई, नवी मुंबई, पुणे, कोकण व महाराष्ट्रातील अन्य भागांतील प्रवाशांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि किफायतशीर प्रवासाची सुविधा मिळेल.

ठाणे, नाशिकलाही थेट जोडणी

नवी मुंबई विमानतळाचे मुख्य विमानतळ अधिकारी सुभाष मुरिकेंचेरी यांनी सांगितले की, या बससेवांमुळे विमानतळाची मुंबई महानगर प्रदेश व आसपासच्या शहरांशी असलेली कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे. प्रमुख निवासी व व्यावसायिक केंद्रांमधून प्रवाशांना विमानतळापर्यंत थेट वाहतूक सुविधा उपलब्ध होईल.

दरम्यान, ठाणे, नाशिक आणि महाराष्ट्रातील अन्य शहरांसाठीही बससेवा सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे आगामी काळात नवी मुंबई विमानतळाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणखी विस्तारणार असून, विमानतळाची महाराष्ट्रातील विविध शहरांशी थेट जोडणी मजबूत होण्याची अपेक्षा आहे.

वाहतूक सुविधा अधिक सक्षम होणार

नवीन एसटीच्या बससेवांमुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची दादर, सीएसएमटी, बोरिवली आणि पुण्याशी थेट जोडणी होणार असून, मुंबई महानगर प्रदेश आणि महाराष्ट्रातील सार्वजनिक वाहतूक सुविधा अधिक सक्षम होणार आहे.

पहिल्या टप्प्यात नवी मुंबई विमानतळ दादर आणि सीएसएमटी मार्गावर दररोज १६ फेऱ्या, बोरिवलीसाठी ८ फेऱ्या आणि पुण्यासाठी २ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. या सेवांसाठी अटल सेतूसह प्रमुख मार्गांचा वापर केला जाणार आहे. ठाणे, नाशिक तसेच महाराष्ट्रातील इतर शहरांसाठी प्रस्तावित बससेवांमुळेनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कनेक्टिव्हिटी आणखी विस्तारणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT