पनवेल (रायगड) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा वाद पुन्हा पेटला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पनवेल महानगरपालिका हद्दीत लावण्यात आलेल्या नवी मुंबई विमानतळाच्या फलकांवर काळे फासून आपला संताप व्यक्त केला. विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव द्यावे, अशी ठाम मागणी यावेळी मनसेकडून करण्यात आली.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरू झाल्यापासूनच या विमानतळाच्या नावावरून मोठा संघर्ष सुरू आहे. स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी वारंवार रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलने केली, निदर्शन केली, निवेदने दिली. आणि त्या मधून विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली, कारण दिबा पाटील यांनी या स्थानिकांचा न्याय, हक्क आणि पुनर्वसनासाठी मोठा लढा दिला होता.
मात्र, आंदोलने आणि मागण्यांना अनेक वर्षे उलटूनही विमानतळाच्या नावाबाबत कोणताही अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर आता मनसेने थेट पालिकेने लावलेल्या फलकांवर काळे फासून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, स्थानिकांच्या भावना दुखावल्या जात आहेत. आम्ही पुन्हा पुन्हा शांततेत मागणी करत आहोत, तरीही शासन आणि विमानतळ प्राधिकरण दुर्लक्ष करत आहेत. जर लवकरच दिबा पाटील यांचे नाव विमानतळाला देण्याचा निर्णय झाला नाही, तर आम्ही मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरू असा इशारा मनसैनिकांनी दिला आहे.