पेण : हाकेला धावणारी तसेच नवसाला पावणारी म्हणून ख्याती असणार्या नागोठणे विभागातील पळस येथील पळसाई मातेच्या नवरात्रोत्सवास सोमवार 22 सप्टेंबर रोजी पासून प्रारंभ झाला आहे. जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असणार्या या मंदिर व परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून भाविकांची देवीच्या दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत.
गावातील एका ग्रामस्थाला देवीने साक्षात्कार घडविला व पळसाई मातेने दिलेल्या दृष्टांता प्रमाणे त्यांनी देवीची मूर्ती सांगितलेल्या ठिकाणावरून आणून तिची प्रतिष्ठापना करण्यात आली व निसर्गरम्य वातावरणात मंदिर बांधण्यात आले. सदरील मंदिर हे शिवकालीन असल्याचे बोलले जाते. देवी या ठिकाणी येऊन शेकडो वर्षे उलटून गेली असली तरी पूर्वी कौलारू असलेल्या मंदिराचा काही वर्षांपूर्वी जीर्णोद्धार करून भव्य मंदिर बांधण्यात आले असून देवीच्या भाविकांमध्ये कमालीची वाढच होत असून ग्रामस्थ कोठेही राजकारण न आणता पळसाई मातेच्या भक्ती रसात रंगून जात असल्यामुळे मुंबई, पुणे, ठाणे, रायगडसह संपूर्ण महाराष्ट्रातील भक्तगण देवीपुढे नतमस्तक होताना दिसून येतात.
या देवीला तीस-पस्तीस वर्षांपूर्वी ’देवी रोगा’ ची लागण झाल्याचा अद्भुत चमत्कार सर्व भक्तांनी साक्षात अनुभवला होता. नवरात्रोत्सव वगळता वर्षभर या देवीला सकाळी व दुपारी कळी किंवा कौल लावण्याचा प्रकार केला जात असून नागोठणे परिसरासह मुंबई, ठाणे, रायगड येथील अडी अडचणीत आलेल्या भक्तांना या कौलाच्या माध्यमातून देवी मार्ग दाखवित असते.त्यामुळे विभागात कौल देणारी पळसाई माता ही एकमेव माता म्हणून या देवीची विशेष प्रसिद्धी आहे.
पूर्वी या मंदिरात जाण्यासाठी पळस गावाचा डोंगर चढून पुढे शेतीच्या बांधावरुन मार्गक्रमण करावे लागत असे. देवीच्या भक्तांना होत असलेली अडचण निदर्शनास आल्यानंतर मंदिर परिसराचे सुशोभीकरणाबाबतचा प्रस्ताव खा. सुनील तटकरे यांच्याकडे ठेवताच खा. सुनील तटकरे, ना. अदिति तटकरे व आ. अनिकेत तटकरे यांच्या माध्यमातून भरघोस निधि येऊन मंदिरापर्यंत जाण्यासाठी डांबरी रस्ता, मंदिराचे नूतनीकरण, परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे.
मंदिर नूतनीकरण, मंदिर परिसर मंदिरापर्यंत जाण्यासाठी आता पूर्णपणे डांबरी रस्ता झाला असून मंदिराचे तसेच परिसराचे सुशोभीकरण करण्यात आल्याची माहीती देवस्थान कमिटी अध्यक्ष शिवराम शिंदे, उपाध्यक्ष मारुती शिर्के,सचिव हिराजी शिंदे, गाव कमिटीचे सचिव प्रसांत भोईर, खजिनदार, नरेश भालेकर, उपसरपंच चंद्रकांत भालेकर व ज्ञानेश्वर शिर्के यांनी दिली.
पळसाई माता नवरात्रोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रम
सोमवार 22 सप्टेंबर रोजी देवीला अभ्यंग स्थान,मातेचा शृंगार व घटस्थापना व पळस ग्रामस्थ व महिला मंडळ भजन,मंगळवार- नागोठणे मित्र मंडळ भजन,बुधवार- राबगाव वरदायनी प्रासादिक मंडळ भजन,गुरुवार- ह.भ.प. रघुनाथ महाराज रसाळ यांचे प्रवचन,शुक्रवार- विविध भागांतील महिलांचे पारंपारिक नाचाचा कार्यक्रम, शनिवार- संजीवनी म्हात्रे प्रस्तुत याल तर हसाल हा कॉमेडी शो,रविवार- मुंबई येथील भोजपुरी मंडळाचा भजन,सोमवार- रा.जि.प.पळस शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम,मंगळवार- नागोठणे येथील श्री स्वामी समर्थ प्रासादिक मंडळाचे भजन,बुधवार- वाघळी येथील काळभैरवनाथ जोगेश्वरी मंडळाचे भजन,गुरुवार- नवरात्र उत्सवाची सांगता होणार असून दररोज सकाळी 08.00 ते 09.00 वा. नामजाप,10.00 व. आरती,सायं.6.00 ते 7.00 वा. हरिपाठ रात्री,8.00 वा. आरती होणार असून दहा दिवस चालणार्या या धार्मिक कार्यक्रमात विविध गावांतील महिला व पुरुषांचे भजन, नाच, कीर्तन,आरती, हरिपाठ सारखे धार्मिक कार्यक्रम घेण्यात येतात.