

मुरूड जंजिरा ः सुधीर नाझरे
नवसाला पावणारी गावदेवी म्हणून कोटेश्वरी देवीचे महात्मे असल्याने नवरात्र असल्याने पहाटे पासून पूजनासाठी रांगा लागतात अशा ह्या देवीची कहाणी जाणून घेण्याची गरज आहे. निसर्गाचे वरदान अनेक शतकांचा प्रदीर्घ इतिहास लाभलेल्या मुरूड शहराच्या वेशीतून प्रवेश करताना दर्शन घडते ते ग्रामदैवता श्री कोटेश्वरी मातेचे.
शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या या ऐतिहासिक भूमीत आध्यात्मिक वारसा आजही त्याच भक्तिभावाने जोपासला जात आहे. जंजिर्याच्या सिद्धीला पराभुत करण्यासाठी छत्रपती शिवरायांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी 3 कि.मी. अंतरावर एका कातळावर किल्ला बांधला हाच तो पद्मदुर्ग ऊर्फ कासा होय. सागरावर ज्याची हुकूमत तोच खरा राज्यकर्ते ही धारणा जोपसत महाराजांनी कोकण किनारपट्टीवर पाच जलदुर्गाची उभारणी केली. त्यातील खुप जास्त महत्त्व असलेला पद्मदुर्ग या घडीला देखील सागरात घट्ट पाय रोवुनी इतिहासाचा मुक साक्षीदार म्हणून उभा आहे.
कोट म्हणजे किल्ला आणि ईश्वरी म्हणजे देवी म्हणुन कोटेश्वरी पद्मदुर्ग कधी सिद्धीकडे तर कधी मराठ्यांकडे, पेशवाई अंतर्गत अंतस्थ कारवायांमुळे किल्लाची मालकी सिद्धीकडे हे चक्र बदलत गेले. इ.स.1760 ते 1770 या दशकात श्री कोटेश्वरीची स्थापना झाली असावी. सिद्धीच्या अमलात मंदिराची निगराणी रहावी म्हणून दिव्याबत्तीसाठी धुपाड अर्थात खलाटी दिली.असा उल्लेख सापडतो.
देवीला रेडा बळी देण्याचा प्रघात संस्थानच्या दिवाण कोटक यांनी बंद केला. संस्थानच्या कार्यरत असणारे रामजी नारायण दिवेकर आणि रामचंद्र बाळु कोर्लेकर यांनी या कामी शिष्टाई केल्याचे बुजुर्ग सांगतात.
नवरात्रौत्सवात संपुर्ण पंचक्रोशी आबालवृद्धांसह दर्शनासाठी अधीर होतात. पुजा-अर्चा, होम-हवन, भजन-पुजन, हळद-कुंकूवा सारखे धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने पार पाडतात. देवस्थान मंडळाच्या विश्वस्त कमिटीमध्ये गावातील प्रत्येक जातीचा सहभाग उल्लेखनीय म्हणावा लागेल. मुरुडच्या माहेरवाशिणी माहेरी आल्या कि पहिले काम म्हणजे कोटेश्वरी आईची ओटी भरणे. देवीसमोर नतमस्तक होऊन आपल्या संसारात सुख सहनती मिळावी यासाठी मागणी मागतात.
1970 मध्ये मंदिराचा जीर्णाव्दार झाला असुन दरवर्षी चैत्र शुद्ध चतुर्दशीला मोठी यात्रा भरते. गेल्या14 ते15 वर्षापासून देवीची पालखी मिरवणुक मोठ्या जल्लोषात काढली जाते. कोटेश्वरी हे साक्षात तुळजाभवानीचे रुप जागृत देवस्थान मानले जाते. व्याघ्रावर आरूढ झालेल्या आदिशक्तीच्या रुप अतिशय तेज पुंज व मोहक दिसते. त्रिशुल, ढाल, तलवार, प्रभावळ, कमरपट्टा पैजण आणि मुखवटा न्याहाळताना या देवी सर्वभुतेषू शक्तीरूपेण संस्थिता म्हणत भक्तगण भक्ती स्वरूपात तद्रुप होतात.