नागोठणे शहर : शामकांत नेरपगार नागोठणे शहरातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून शुद्ध पाणीपुरवठ्याची प्रतीक्षा असतानाच २२ सप्टेंबरपासून घराघरातील नळांना मातीमिश्रित गढूळ पाणी येत असल्याने नागोठणेकरांच्या संतापात भर पडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून येणारे पाणी अत्यंत गढूळ असल्याने दैनंदिन वापरासह आंघोळीसाठीही नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विशेषतः गृहिणींची मोठी गैरसोय होत असून, या अशुद्ध पाशामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागोठणेकरांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत असताना, शुद्ध पाणी राहिले बाजूला, आता गढूळ पाण्याचाही सामोरे जाण्याची वेळ आली, अशी संतापत प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे. दरम्यान, सुधागड तालुक्यातील जांभूळपाड परिसраतील झालेल्या जोरदार पावसामुळे अंबा नदीत मातीमिश्रित गढूळ पाणी वाहून येत असल्याने त्याचा परिणाम नागोठण्याच्या पाणीपुरवठ्यावर झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, याबाबत संबंधित यंत्रणेकडून अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.
नागोठणे परिसरातील रिलायन्स कंपनीलगतच्या गावांना कंपनीकडून शुद्ध पाणीपुरवठा केला जात आहे. नागोठणे हे देखील रिलायन्सच्या प्रकल्पालगतचे गाव असताना नागोठणेकरांना शुद्ध पाणीपुरवठा केला जात नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. रिलायन्स कंपनीच्या वाढीव प्रकल्पाचे काम नागोठणे परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असून, हजारो कामगारांचा या भागात वावर तर आहेच परंतु रिलायन्स कंपनीचे अनेक कामगार मोठ्या संख्येने नागोठण्यात राहत आहेत. त्यामुळे नागोठणे शहरातील पाणी, रस्ते व इतर मूलभूत सुविधांवर अतिरिक्त ताण पडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
कंपनीचा वाढता विस्तार आणि त्यातून निर्माण होणारा अतिरिक्त भार नागोठणे ग्रामपंचायतीनेच का सोसावा, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. याशिवाय रिलायन्स कंपनी व्यवस्थापनाकडून नागोठण्याला अपेक्षित सीएसआर निधी मिळत नसल्याची तक्रारही नागरिकांकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यातील इतर भागांत कंपनीकडून सीएसआरच्या माध्यमातून विविध कामे केली जात असताना नागोठण्याकडे दुर्लक्ष का, असा सवालही नागरिक विचारत आहेत. या संपूर्ण पाणीप्रश्नावर नागोठण्याचे पहिले लोकनियुक्त सरपंच तथा विद्यमान सदस्य डॉ. मिलिंद धात्रक यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
नागोठणेकरांना लवकरात लवकर शुद्ध पाणीपुरवठा सुरू करावा. आता बास झाले, आम्ही किती सहन करायचे? असा सवाल करत डॉ. धात्रक यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. रिलायन्स व्यवस्थापनाने नागोठणेकरांना शुद्ध पाणीपुरवठा सुरू न केल्यास गणपती उत्सवाची सांगता झाल्यानंतर काही दिवसांनी नागोठणेकर ग्रामस्थांच्या सहकार्याने मिरा मोहीद्दीन शाह बाबा चौक (रिलायन्स सर्कल) येथे रिलायन्स कंपनीच्या बसेस थांबवण्यात येतील व एकाही कामगारला नागोठण्यात प्रवेश दिला जाणार नाही.
यानंतर निर्माण होणाऱ्या सर्व परिस्थितीची जबाबदारी रिलायन्स व्यवस्थापनाची राहील, असा इशारा डॉ. धात्रक यांनी दिला आहे. नागोठणेकरांच्या आरोग्याशी संबंधित हा पाणीप्रश्न लक्षात घेता ग्रामपंचायत, पाणीपुरवठा विभाग आणि रिलायन्स व्यवस्थापनाने तातडीने हस्तक्षेप करून नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी होत आहे.
जांभूळपाडा (ता. सुधागड) परिसरत झालेल्या जोरदार पावसामुळे अंबा नदीत मातीमिश्रित गढूळ पाणी वाहून येत असल्याने त्याचा परिणाम नागोठण्याच्या पाणीपुरवठ्यावर झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.