रायगड : अलिबाग शहरातील क्रीडा भवन येथे मुस्लीम प्रिमिअर लिग ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. अलिबाग, मुरूड, पेण, व रोहा तालुक्याकरीता मर्यादीत असलेल्या स्पर्धेचे उद्घाटन अलिबागचे नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी पार पडले. याप्रसंगी अलिबागच्या उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, नगरसेवक अनिल चोपडा, सागर भगत, अभय म्हामुणकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेत एकूण 12 संघ सहभागी झाले आहेत. तीन दिवसीय या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी क्रीडा भवन समोर क्रीडाप्रेमींनी अलोट गर्दी केली होती. स्पर्धेतील अंतिम सामन्यानंतर प्रथम क्रमांकाला रोख साठ हजार रुपये व चषक, द्वितीय क्रमांकाला रोख तीस हजार रुपये व चषक व तृतीय क्रमांकाला वीस हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
तसेच मालिकावीराला चषक व आणि टीव्ही, उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज यांना प्रत्येकी एक चषक आणि कुलर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला चषक आणि शुज देऊन गौरविण्यात येणार आहे. मुस्लीम प्रिमिअर लीग ही क्रिकेट स्पर्धा अलिबागमध्ये पहिल्यांचा भरविण्यात आली आहे. 14 जानेवारीला बक्षीस वितरण समारंभ पार पडणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.