Murud Paddy Farming Pudhari
रायगड

Murud Paddy Farming: मुरुड तालुक्यात भात लावणीची कामे पूर्ण

मजुरांची टंचाईमुळे शेतकरी मेताकुटीस; वाढत्या मजुरी दरामुळे उत्पादन खर्चात होतेय वाढ

पुढारी वृत्तसेवा

सुधीर नाझरे

मुरुड जंजिरा: मुरुड तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस पडल्यामुळे भात लावणी अखेरच्या टप्प्यात आली आहे. दमदार पावसामुळे खारपट्टयात तसेच सखल भागातील शेती लावण्यात शेतकरी वर्ग जुलैच्या दुसऱ्या आठवड्या पासुनव्यस्त दिसुन येत होता. तालुक्यात बहुतेक भात लावणीचे काम पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

यंदा पावसाने ओढ दिल्याने धुळपेरणी वाया गेली. दुबार पेरणीचे संकट ओढवले. पावसाचे प्रमाण कमी अधिक झाल्याने बहुतांशी शेतकऱ्यांना रोहू पद्धत वापरावी लागली. मात्र खताचा कितीही मारा केला तरी धुळ पेरणीतून रोपांची होणारी वाढ त्यातून मिळणारा नायट्रोजन याची सर रोहू पद्धतीला येत नसल्याचा प्रत्यय यंदा शेतकऱ्यांनी घेतल्याची चर्चा आहे.

गतवर्षी मुरूड तालुक्यात १५ जुलैपर्यंत भात लागवड पूर्ण झाली होती. यंदा मात्र पावसाच्या अनियमित पणामुळे ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत भातलागवड केली गेली. आतापर्यंत २०८० मि.मी इतकी पावसाची नोंद झाली असून अद्याप आणखी पावसाची अपेक्षा व्यक्त होत आहे.

मुरुड तालुक्यात ३३०० हेक्टर भात लागवडीचं क्षेत्र असून या क्षेत्रामध्ये शेतकरी सुवर्णा, जया, रूपाली, चिंटू, वाडा कोलम, रत्ना, शुभांगी, कर्जत व खारपट्यात जमिनीवर - पनवेल, इत्यादी भाताच्या जातीची लागवड करण्यात आली आहे. यंदा अधिकाधिक शेतकऱ्यांना धुळ पेरणी वाया गेल्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून शेतकऱ्यांनी रोहू पद्धतीने भात पिकाच्या रोपवाटिकेची पेरणी करावी लागली.

प्रामुख्याने यामध्ये भात बियाणे २४ तास पाण्यामध्ये भिजवून मोड आल्यानंतर शेतामध्ये चिखलणी करून त्यावर बियाणांची पेरणी करून रोपवाटिका तयार केल्या जातात . शेतकऱ्यांनी रोहू पद्धतीने पेरणी करून सुरुवातीच्या काळात भात खाचरातील पाण्याचा पूर्णपणे निचरा होईल याची काळजी घेतलेली आहे. तसेच चिमणी, पक्षी भाताचे बियाणे खाऊ नये म्हणून स्वतः तेथे उपस्थित राहून संरक्षण केलेले आहे, परिणामी भात रोपवाटिका चांगल्या पद्धतीने तयार होत आहेत.

अशी माहिती कृषी विभागातील सहाय्यक कृषी अधिकारी मनोज कदम यांनी दिली. भात लावणीच्या कामात दरवर्षी प्रमाणे यंदा ही मजुरांची टंचाई भासली. ग्रामीण भागात ही समस्या दिवसेंदिवस भेडसावते आहे. खरीप हंगामातील भात हे एकमेव पीक असल्यामुळे लावणीसाठी रोजंदारीवर महिला शेतात राबतांना दिसत होती. नागऱ्यांना निपोटी १ हजार रुपये तर पुरुषांना ६०० तर महिलांना ३०० ते ४०० रुपये मजुरी द्यावे लागते.

अद्यापही पारंपरिक भातशेती ला प्राधान्य

कृषी कार्यालयाकडून ग्रामपंचायतनिहाय भात लागवडीच्या सगुणा राईस टेकनिक व चारसुत्री भात लागवडीचे प्रयोग प्रात्यक्षिका द्वारे केले जातात. सगुणा पद्धतीत नांगरणीचा खर्च वाचत असल्याने शेतकऱ्यांकडून या पद्धतीला अधिक पसंती मिळत असली तरी पारंपारिक पद्धतीने बहुतांशी शेती लावण्याचा प्रघात दिसतो.

यांत्रिक पद्धतीने भात लागवडीसाठी शेतकरी पुढे येत असला तरी हे प्रमाण नगण्य आहे. प्रती वर्षी प्रात्यक्षिके घेत असते परंतू अत्यल्प भू धारक असल्याने १० ते २० गुंठे भात क्षेत्रासाठी ही पध्दत लाभदायी नसल्याचे सांगितले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT