मुरुड जंजिरा ः सुधीर नाझरे
मुरुड नगरपरिषद निवडणुकीसाठी मुरुड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सज्ज झाली आहे. बुधवारी माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत निवड केलेल्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. थेट नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर यांची कन्या आराधना मंगेश दांडेकर यांचे नाव जाहीर करण्यात आले.
उच्च शिक्षित उमेदवाराची थेट नगराध्यक्ष पदासाठी प्रथमच निवड करण्यात आली.माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर यांचे मुरुड शहरात सर्वांशी असलेले घनिष्ठ संबंध याचा फायदा थेट नगराध्यक्ष निवडून येण्यासाठी होईल हा कयास बांधत प्रथमच सर्वात तरुण उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून निवडणूक रिंगणात उतरविण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. सहकारी पक्ष यांच्याशी चर्चा झाल्यावर उर्वरित नावे सुधा जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी सांगितले की, मुरुड नगरपरिषद निवडणुकीसाठी जाहीर केलेले उमेदवार हे जनमानसात परिचित असून सामाजिक कामाची झालर असलेले सर्व उमेदवार आहेत.
आमचे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिलेदार निश्चित निवडून येणार असून मुरुड नगरपरिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्र पक्षाचा झेंडा फडकलेला पहावयास मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी घरा घरात पोहचून आपल्या या उमेदवारांचा प्रचार करून मोठ्या मताधिक्याने निवडून कसे येतील यासाठी अथक परिश्रम घ्यावे असे आवाहन यावेळी तटकरे यांनी केले.
सदरील कार्यक्रम प्रसंगी मुरुड तालुका अध्यक्ष फैरोज घलट्रे, मुरुड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन मनोज भगत, सचिव विजय पैर, मुरुड शहर अध्यक्ष संजय गुंजाळ, माजी नगरसेवक प्रकाश सरपाटील, वासंती उमरोटकर, विश्वास चव्हाण, हसमुख जैन आदी सह असंख्य कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.
विविधप्रभागातील उमेदवार
प्रभाग क्रमांक दोन अ मधून प्रिता चौलकर, ब मधून राकेश मसाल, प्रभाग क्रमांक तीन ब मधून माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर , प्रभाग क्रमांक चार अ मधून माजी नगरसेवक विश्वास चव्हाण, ब मधून तरनुम फराश, प्रभाग क्रमांक पाच अ मधून प्रमिला माळी, ब मधून तमिम धाकम. प्रभाग क्रमांक सहा ब मधून शबाना सुर्वे, प्रभाग क्रमांक सात अ मधून वासंती उमरोटकर, ब मधून अमित कवळे , प्रभाग क्रमांक आठ ब मधून ॲड. मृणाल खोत, तर प्रभाग दहा ब मधून अध्यक्ष हसमुख जैन यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
मुरुडच्या विकासाला राष्ट्रवादीने नेहमीच प्राधान्य दिलेले आहे. खा.सुनील तटकरे,मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी उपलब्ध झालेला आहे.होणारही आहे.जनतेच्या विकासाला आम्ही नेहमीच महत्व देत आलेलो आहोत.अनिकेत तटकरे, माजी आमदार