मुरुड जंजिरा (रायगड) : मुरुड आगारात गॅस पंप होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडीवर असून यासाठी खासदार सुनील तटकरे यांनी 4 सप्टेंबर रोजी एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत एसटी मंडळ तसेच अन्य महत्वाचे अधिकारी वर्ग तसेच तेल कंपन्याचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. मुरुड आगारामध्ये गॅस पंप त्वरित करण्यात यावा या बाबत ठोस निर्णय होऊन तातडीने अंमलबजावणी होणार असल्याचे मुरुड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले आहे.त्यामुळे मुरुड आगारात लवकरच गॅस पंप होण्याचा मार्ग लवकरच सुटणार आहे.
मुरुड हे पर्यटन स्थळ असून येथे सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला व मौजमजा करण्यासाठी लाखो पर्यटक येत असतात. मुरुड आगाराच्या सर्व गाड्या आता गॅस वर आधारित झाल्याने या गाडयांना रामवाडी पेण अथवा अलिबाग आगार येथे गॅस भरण्यासाठी तासंतास खोळंबून रहावे लागत आहे. सध्या गणपती उत्सवाचा हंगाम असताना सुद्धा मुंबई वरून मुरुड येथे येणार्या गाडयांना येथून गॅस भरताना खूप वेळेची प्रतीक्षा करावी लागत आहे. एसटी महामंडळाने सर्व गाड्या गॅस वर केल्याने डिझेल मध्ये होणारा अतिरिक्त खर्च वाचला परंतु प्रवाशी वर्गाला मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एसटी महामंडळाने गाड्या गॅस वर करण्याआधी जेवढी आगार आहेत तिथे गॅस पंप तयार करणे खूप आवश्यक होते. परंतु तसे न करता रायगड जिल्ह्यात नेमक्याच ठिकाणी गॅस पंप तयार केल्याने प्रवासी वर्गाला याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
या बाबत काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते, माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर यांनी खासदार सुनील तटकरे याना निवेदन देऊन मुरुड आगारात गॅस पंपाची निर्मिती व्हावी यासाठी प्रयत्न केले होते. प्रवासी वर्गाच्या वेळेची बचत व्हावी व प्रवास जलद व्हावा यासाठी त्यांनी हे निवेदन खासदार सुनील तटकरे याना दिले होते.
खा. सुनील तटकरे हा प्रश्न लवकरच सोडविणार असून मुरुड तालुक्याच्या हितासाठी व प्रवासी वर्गाची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून लवकरच गॅस पंपाचे काम झालेले पहावयास मिळणार असल्याचा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. मुरुड आगारात गॅस पंप कार्यान्वित झाल्यास प्रवासी वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे.हसमुख जैन, सोशल मिडिया सेल जिल्हा उपाध्यक्ष
खा. सुनील तटकरे हा प्रश्न नक्कीच सोडवणार आहेत.आमचा पाठपुरावा सुरु असून लवकरच निश्चित यश मिळणार आहे. यामुळे नागरिकांसह प्रवाशांचीही सोय होणार असल्याचे दांडेकर यांनी सांगीतले. खा. तटकरे यांच्या दालनात विशेष बैठक होणार असून प्रवासी वर्गाच्या हितासाठी लवकरच गॅस पंप होणार असल्याचे ते म्हणाले.