पेण शहर : पेण तालुक्यातील हेटवणे धरणाचे पाणी नवी मुंबईला जास्त प्रवाहने घेऊन जाण्यासाठी सिडकोच्या माध्यमातून मेघा इंजिनियर कंपनीद्वारे जिते आणि बेलवडे याठिकाणी जलबोगद्याचे काम सुरू आहे. या कामामुळे मुंगोशी गावाला दूषित पाणी पुरवठा होत असल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले असून याबाबत प्रांताधिकारी कार्यालय येथे खासदार धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला खासदार धैर्यशील पाटील, प्रांताधिकारी प्रवीण पवार, जिप. माजी सभापती डी. बी. पाटील, सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे, बेलवडे सरपंच हरेश पाटील, सिडकोचे अधिकारी मेघा इंजिनियर कंपनीचे अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक विक्रम नवरखेडे आदिसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ग्रामस्थांनी दूषित पाण्यासंदर्भात आवाज उठून अनेकदा सदर कंपनीला सांगितले आहे मात्र याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असून याबाबत दोन दिवसांपूर्वी महिला विचारणा करण्यासाठी कंपनी गेट जवळ गेले असता येथील मोहन पाटील व सुभाष पाटील यांनी जिते येथील चार पाच गावगुंडांना बोलावून महिलांबरोबर धक्काबुक्की केली याची तक्रार पोलिसांत केली आहे.
याबाबत खासदार धैर्यशील पाटील यांनी सदरची घटना ही निंदनीय असून कंपनीची मुजोरी येथील स्थानिक ऐकून घेणार नाही अशा पद्धतीचे कोणी गुंड येऊन महिलांना दमबाजी अथवा मारहाण करत असेल तर त्यांच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे व आशा गावगुंडांना वेळीच जरब देणे आवश्यक आहे.
एकीकडे विकास होत असताना कंपनीने आमच्याशी सौजन्याने वागणे अती महत्वाचे असून ज्या काही समस्या संबंधित ग्रामस्थांच्या आहेत त्यात ताबडतोब सोडवाव्यात असा सज्जड दम खासदार यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला. तर कंपनीकडून होत असलेला दूषित पाणीपुरवठा बंद करून स्वच्छ पाणीपुरवठा करावा, कंपनीच्या आवारात असणाऱ्या सेक्युरिटी गार्डंना तात्काळ काढून टाकावे, सीएसआर फंडाच्या माध्यमातून येथील गावांचा विकास करावा, कंपनीने या गावातील मुलांना नोकरीत सामावून घ्यावे, या मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा सिडको तसेच मेगा इंजिनियर कंपनीच्या विरोधात उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी दिला आहे.
मुंगोशी ग्रामस्थांकडून करण्यात आलेल्या मागण्याांबाबत सकारात्मक विचार करून गावाला स्वच्छ पाणीपुरवठा येथील सिक्युरिटीवरील दोन व्यक्ती हलविण्यात येईल तसेच प्रत्येक घरात स्वच्छ पाणी पुरवठ्याचे जार पोचविण्यात येतील यासह इतर मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.पी.आरूण, अधिकारी, मेघा इंजिनियर कंपनी
कंपनीचे येणारे दूषित पाणी याबाबत ग्रामस्थांची तक्रार होती. त्यानुसार आज बैठक झाली, त्यात त्यांच्या गावाच्या विहिरीच्या पुढे जावून हा पाणी सोडला जाईल आणि तोपर्यंत येथील ग्रामस्थांना फिल्टर प्लांटचे पाणी दिले जाणार आहे.राजेंद्र पोतदार, सिडको अधिकारी