Mumbai Pune Expressway Missing link project
खोपोली ः मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील बहुप्रतिक्षित मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम आता शेवटच्या टप्प्यात आले आहे. केवळ एका डेक सेक्शनचे काम शिल्लक असून, 1 मे 2026 (महाराष्ट्र दिन) पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य प्रशासनाने ठेवले आहे. या नवीन मार्गामुळे प्रवाशांचा प्रवास केवळ वेगवानच होणार नाही, तर तो अधिक सुरक्षितही होणार आहे.
धोकादायक वळणांना बायपास
सध्या लोणावळा ते खंडाळा दरम्यानचा 19.8 किमीचा मार्ग अत्यंत वळणदार आणि चढ-उताराचा आहे. नवीन मिसिंग लिंकमुळे हा प्रवास केवळ 13.3 किमीचा होईल. नवीन मार्ग हा घाट सेक्शनमधील तीव्र वळणे आणि अपघातप्रवण क्षेत्र टाळणार आहे. यामुळे चालकांना चांगली व्हिजिबिलिटी मिळेल आणि अपघातांचे प्रमाण कमी होईल. या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे दरम्यानचे अंतर सुमारे 6 किमीने कमी होईल आणि प्रवाशांचे 25 ते 30 मिनिटे* वाचतील.
टोल दराबाबत दिलासा
प्रवास वेगवान होणार असल्याने टोल वाढणार का? अशी भीती नागरिकांमध्ये होती. मात्र, अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, टोलमध्ये कोणतीही अचानक किंवा मोठी वाढ केली जाणार नाही. त्याऐवजी, टोल वसुलीचा कालावधी 2045 पर्यंत वाढवण्यात आला आहे. टोल दरांचा पुढील आढावा 2030 मध्ये घेतला जाईल. सध्या या महामार्गावरून दररोज 75 हजार वाहने धावतात, तर सुट्ट्यांच्या दिवशी ही संख्या 1.20 लाखांपर्यंत पोहोचते.