Mumbai Pune Expressway Crime AI Photo
रायगड

Mumbai Pune Expressway Robbery | मुंबई-पुणे द्रुतगतीवर दरोडेखोरांचा धुमाकूळ; दगडफेक, हल्ले आणि लुटमारीने चालकांमध्ये भीती

कळंबोली-खालापूर पट्टा ठरतोय 'हॉटस्पॉट'; गस्त वाढविण्याची ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Mumbai Pune Expressway Crime

विक्रम बाबर

पनवेल : देशातील सर्वाधिक सुरक्षित आणि वेगवान महामार्गांपैकी एक मानल्या जाणाऱ्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दरोडेखोरांच्या टोळ्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याचे चित्र समोर येत आहे. रात्रीच्या वेळी वाहनांवर दगडफेक करून ती थांबवणे, चालकांना मारहाण करून रोख रक्कम, सोन्याचे दागिने, मोबाईल आणि इतर मौल्यवान वस्तू लुटून पसार होणे, अशा घटनांमध्ये वाढ झाल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेषतः कळंबोली सर्कल ते खालापूर टोलनाका आणि खालापूर ते कळंबोली या संपूर्ण पट्ट्यात अशा घटनांचे प्रमाण वाढल्याने अनेक वाहनचालकांनी या मार्गाला 'चोरीचा महामार्ग' अशी उपमा दिली आहे.

वाहनचालकांच्या माहितीनुसार, अमिटी विद्यापीठ परिसर, भाताण बोगदा आणि कोन गाव एक्झिट हे दरोडेखोरांच्या हालचालींचे प्रमुख ठिकाण बनले आहेत. रात्री उशिरा किंवा पहाटे वाहतूक कमी होताच टोळ्या सक्रिय होतात. मालवाहू ट्रक, कंटेनर, खासगी चारचाकी तसेच व्यावसायिक वाहने हेरून त्यांच्यावर अचानक दगडफेक केली जाते. वाहनाच्या काचा फुटल्यानंतर किंवा चालक घाबरून वाहन थांबवताच चार ते सहा जणांची टोळी वाहनात घुसून चालकाला मारहाण करते. त्यानंतर गळ्यातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल आणि इतर मौल्यवान वस्तू लुटून आरोपी सेवा रस्ते किंवा झाडीचा आधार घेत काही मिनिटांत पसार होतात.

या प्रकारात अनेक चालक जखमी झाल्याची माहिती समोर येत असून, आरोपी घटनास्थळावरून झटपट पसार होत असल्याने त्यांचा माग काढणे पोलिसांसमोरही मोठे आव्हान ठरत आहे.

भाताण बोगद्याजवळ ट्रकचालकावर हल्ला

शुक्रवारी अशाच प्रकारची घटना भाताण बोगद्याजवळ घडली. पुण्यातून ट्रक घेऊन मुंबईकडे निघालेल्या अर्जुन यादव यांच्या वाहनावर अज्ञातांनी दगडफेक केली. दगड त्यांच्या हाताला आणि गालाला लागल्याने त्यांनी वाहन थांबवले. त्याच क्षणी चार अज्ञात व्यक्ती ट्रकमध्ये घुसल्या. त्यांनी यादव यांना मारहाण करून त्यांच्याकडील सुमारे पाच हजार रुपये रोख, सोन्याची बाली आणि इतर वस्तू लुटून पलायन केले.

घटनेनंतर चालकाने पोलिसांशी संपर्क साधला. मात्र, घटनास्थळ कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते, याची पडताळणी करून पुढील कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आल्याची माहिती चालकाने दिली.

गस्त वाढविण्याची मागणी

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अमिटी विद्यापीठ, खालापूर टोलनाका, भाताण बोगदा आणि कोन गाव एक्झिट परिसरात डिझेल चोरी, दरोडे आणि लुटमारीच्या घटना वारंवार घडत असल्याचा आरोप ट्रान्सपोर्ट व्यावसायिक तुकाराम सरक यांनी केला आहे. या ठिकाणी स्थानिक पोलिसांनी नियमित गस्त वाढवून दरोडेखोरांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे वाहनचालकांमध्ये निर्माण झालेली भीती कमी होऊन महामार्गावरील सुरक्षाही अधिक बळकट होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT