रायगड : जयंत धुळप
मुळात देशाची आर्थिक राजधानी असणारे मुंबई शहर आणि राज्याची सास्कृतीक राजधानी असणारे पुणे शहर या दोन मोठ्या शहरांमधील वाहतूक निर्वीघ्न आणि गतिमानतेने होण्याकरिता निर्माण केलेल्या मुबंई पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहतूक तब्बल 31 तास ठप्प राहाते, हे सरकार आणि प्रशासन या दोघांचेही अपयश असून, सरकारचे प्रशासनावर नियंत्रण आहे की नाही असा प्रश्न या निमीत्ताने निर्माण झाला असल्याची खंत, याच मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर 2013 मध्ये प्रोपेलीन याच गॅसची टँकरमधून झालेली गळती थांबविण्यात यश मिळवून पूढील चार तासांत वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रत्यक्ष काम केलेले रायगड जिल्ह्यातील थळ-अलिबाग येथील 38 वर्षांचे अनूभवी रसायन तज्ज्ञ श्रीपाद लेले यांनी दैनिक पुढारी शी बोलताना दिली आहे.
श्रीपाद लेले हे 30 वर्ष थळ येथील आरसीएफ लि. कंपनीमध्ये अग्निशमन आणि सुरक्षा विभागाचे चिफ इंजीनिअर तर त्यानंतर दिपक फर्टिलायझर्स कंपनीत औग्योगिक सुरक्षा, आरोग्य आणि पर्यावरण विभागाचे उपाध्यक्ष म्हणून 8 वर्ष कार्यरत होते. त्या दरम्यान ते जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील रायगड डिस्ट्रीक्ट क्रायसेस गृपमध्ये केमिकल एक्स्पर्ट म्हणून देखील कार्यरत होते. या दरम्यान मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर 2013 मध्ये झालेली प्रोपेलीन गॅस गळती अवघ्या चार तासात रोखण्यात यश मिळवले होते आणि त्यामुळे चार तासांत वाहतूक पूर्ववत सुरु झाली होती. त्यानंतर केरळ राज्यात झालेल्या प्रोपेलिन गॅस गळतीच्या दोन घटनांमध्ये मुंबईतून विमानाने तत्काळ केरळमधील घटनास्थळी पोहोचून, तेथील प्रोपेलिन गॅस गळती ऱोखण्यात यश मिळवले आहे. त्यांच्या या प्रदिर्घ अनूभवा नंतर मंगळवारी मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर झालेली प्रोपेलीन गॅस गळती आणि ती रोखण्यात यंत्रणेला लागलेला तब्बल 24 ते 26 तासांचा वेळ आणि झालेली वाहतूक कोंडी या मुळे ते अत्यंत व्यथीत झाल्याचे लेले यांनी सांगीतले.
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक 30-31 तास बंद हे ऐकून एमएसआरडीसी, महामार्ग पोलीस, वाहातूक पोलीस, महामार्गावरील टोल यंत्रणा आणि सरकार या सर्वांची कीव करावी तेवढी थोडीच आहे, असे वाटायला लागल्याचे ते म्हणाले. कोचीहून गुजरातकडे जाणारा हा प्रोपिलीनचा टँकर अपघात ग्रस्त होऊन घाटमार्गात कलंडला, त्याच्या वॉल्ववर क्रॅक उद्भवल्या मुळे प्रोपिलीनची गळती सुरू झाली. पण चोवीस तासात गळती बंद करून वाहतूक सुरळीतपणे सुरू करता आली नाही, हे प्रशासन आणि आपत्ती निवारण यंत्रणांचे निश्चितच अपयश मानायला हवे.
कोणत्याही आपत्तीचे नियंत्रण करण्यासाठी सरकारी यंत्रणेकडे “जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण“ ही संबंधीत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असते. जिल्ह्यात आपत्ती नियंत्रण अधिकाऱ्याची नियुक्तीही केलेली असून या व्यवस्थेच्या नियमित बैठकाही होत असतात. मात्र सरकारी अधिकारी या घटनांकडे अत्यंत दुर्लक्षित करतात, याचा जिवंत अनुभव या महामार्गाच्या 30 ते 31 तासांपेक्षा जास्त वेळ वाहतूक बंद स्थितीमुळे जाणवला.
रसायनांचा टँकर रस्त्यावर अपघात ग्रस्त झाल्यास रसायन पाठविणाऱ्या कंपनीची, रसायन विकत घेणाऱ्या कंपनीची आणि वाहतूकदार, या तिघांचीही जबाबदारी रस्ता वाहतूक सुरळीतपणे सुरू ठेवण्याची असते. प्रोपिलीनसारखा अतीज्वलनशील पेट्रोलियम पदार्थाचा टँकर जेव्हा अपघात ग्रस्त होतो, जिल्ह्यातील मोठ्या रासायनीक कंपन्यातील तज्ञ माणसे त्वरित बोलावणे आवश्यक होते, त्यांचेकडे एका टॅकरमधून दुसऱ्या टॅकरमध्ये प्रोपिलीन ट्रान्स्फर करण्यासाठी आवश्यक पंपिंग व्यवस्था करणाऱ्या गाड्या ही उपलब्ध असतात. पण मंगळवारी सायंकाळी झालेल्या अपघातानंतर रात्रीत कोणतेही तज्ञ बोलावले गेले नाहीत. जागेवर आलेले फायरमन हे अशा जोखीमीच्या ठिकाणी पाणी फवारण्या व्यतिरिक्त कामाचे नसतात, असे लेले यांनी लक्षात आणून दिले आहे.
रस्त्यावरील वाहतूकीचा जोर लक्षात घेऊन वहातूक वळवण्याचे निर्णय तातडीने घेणे आवश्यक होते. मुंबई पुणे द्रुतगती आणि जूना मार्ग उपलब्ध आहे. दोन्ही मार्ग मिळून एक दिशा मार्ग ताबडतोब सुरू करणे आवश्यक होते. जेणेकरून चौवीस तासांपेक्षा जास्त झालेले प्रवाशांचे हाल थांबवता आले असते.घाट सेक्शन पुरता जून्या हायवेचा आधार घेऊन, एक दिशा वाहातूक पोलिसांनी सुरू ठेवणे सहज शक्य होते.
प्रोपेलीन टँकर उलटून गॅस गळती झाल्याची घटना घडल्या बरोबर आपत्ती निवारण यंत्रणेसह एनडीआरएफ, पोलीस, महसूल आदि सर्व यंत्रणा घटनास्थळी सत्वर पोहोचल्या होत्या. मात्र प्रोपेलीन गॅस गळती रोखण्याकरिताचे केमिकल एक्स्पर्ट उपलब्ध नसल्याने ही गळती रोखण्यात विलंब झाला. राज्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडे प्रोपेलिन केमिकल एक्सपर्ट उपलब्ध नव्हते. घाईने निर्णय घेणे यावेळी शक्य नव्हते. अखेर ओएनजीसी कंपनीची टेक्नीकल टिम आल्यावर गळती रोखून गॅस दुसऱ्या टँकरमध्ये भरुन वाहतूक सुरु करण्यात आली.संदेश शिर्के, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण.
तब्बल तीस तासापेक्षा अधिककाळ या आपत्तीमुळे एक्सप्रेसवेवर एकाच ठिकाणी अडकून पडलेल्या प्रवाशांना एका ठिकाणी स्थानिक तहसिलदारांनी पाणी व काही बिस्किटे दिली. परंतू सुमारे 25 किमी अंतरात अडकलेल्या अन्य प्रवाशांना ड्रॉण व हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पिण्याचे पाणी व बिस्किटे देणे शक्य होते. परंतू हे रायगड जिल्हा प्रशासनाला का सुचले नाही. याचा विचार आतातरी प्रशासनाने करणे अनिवार्य आहे.अमर वार्ड, ज्य़ेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा शिक्षण तज्ज्ञ