महामार्गावर अपघातप्रवण 32 ब्लॅकस्पॉट pudhari photo
रायगड

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघातप्रवण 32 ब्लॅकस्पॉट

पुढारी वृत्तसेवा
रायगड ः किशोर सुद

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघात सुरुच आहेत. यावर्षी 1 जानेवारी ते 31 जुलै या सात महिन्यात 91 अपघात झाला असून यात 36 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 108 गंभीर जखमी झाले आहेत. महामार्गावर 32 ब्लॅकस्पॉट आहेत. या ठिकाणांवर होणारे अपघात रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पाऊले उचलण्यास सुरुवात केली असून, महामार्गावरील अपघातांच्या माहितीचे विश्लेषण करुन अपघातांची कारणे व त्या ठिकाणी करावयाच्या उपाययोजनांवर विचारविनिमय करावा असे निर्देश जिल्हा प्रशासनाने विभागांना दिले आहेत.

रायगड जिल्ह्यातील पळस्पे ते कशेडी या 154 किलोमीटर दरम्यान मुंबई-गोवा महामार्ग जातो. महामार्गावरुन दररोज सुमारे 1 लाख 85 हजार 942 मेट्रिक टन एवढी वाहतुक होते. तसेच पळस्पे ते इंदापूर या 84 किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्यातील मार्गाचे चौपदरीकरणाचे काम 13 वर्षांपासून रखडले आहे. तसेच इंदापूर पुढील दुसर्‍या टप्प्याच्या कामाचीही तीच गत आहे. महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून, ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत, तसेच पर्यायी मार्ग, पुलांची कामे, संरक्षक फलकांचा अभाव या सर्व बाबींमुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याचे दिसून येते. परिणामी महामार्गावर अपघातात मृत्युमुखी पडणार्‍यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर 32 ब्लॅकस्पाट आहेत. खारपाडा ब्रिज, खरोशी फाटा, तरणखोप, रामवाडी, उघडे, वाशी फाटा, डोलवी, गडब, कासू, आमटेम, पेण फाटा ते अंगार आळी, तळवली, सुकेळीखिंड, पुई, मुगवली, कशेणे, ढालघर, तिलोरे, रेपोली, लोणेरे, टेमपाले, गोरेगाव बसस्थानक, तळेगाव, लोणेरे, गांधारपाले, टेमपाले ते लाखपाले, वीर, धामणदेवी, लोहारे, दासगाव आदी ठिकाणांचा यात समावेश होतो. ब्लॅकस्पॉट म्हणजे ज्या ठिकाणी 10 पेक्षा जास्त मोठे अपघात झाले आहेत. एकात्मिक रस्ते अपघात माहिती प्रणालीवरील अपघातांच्या माहितीचे विश्लेषण करुन अपघातांची कारणे व त्या ठिकाणी करावयाच्या उपाययोजनांवर विचारविनिमय करावा, तसेच अपघात रोखण्यासाठी संबंधित ठिकाणी करावयाच्या लघुकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना निश्चित कराव्यात. आवश्यक तेथे वेग नियंत्रणासाठी रस्त्यावर रम्बलर्स बसविणे, थर्मोप्लास्टिक रोड मार्किंग्ज, सूचना फलक, रस्त्यावरील परावर्तक, ब्लिंकर्स, रिफ्लेक्टर्स आदी उपाय योजण्यात यावेत. यासाठी ब्लॅकस्पॉट निहाय संयुक्त सर्वेक्षण करुन उपाययोजना सुचविण्यात याव्यात. सर्वेक्षणासाठी या क्षेत्रात काम करणार्‍या तज्ज्ञ सामाजिक संस्थांचेही सहकार्य घेण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक विभाग तसेच इतर संबंधित विभागांना दिले आहेत.

अपघातांमुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी वारंवार अपघात होणार्‍या ठिकाणांच्या परिसरात ,’108 रुग्णवाहिका सेवेतील रुग्णवाहिकांची स्थायी थांब्याची ठिकाणे ठरवावीत, रुग्णालयात लवकरात लवकर अपघातग्रस्तांना पोहोचविण्याच्यादृष्टीने आपत्कालीन वाहतूक आराखडे तयार करण्याच्या यादृष्टीने कार्यवाही करावी, अशा सूचनाही जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.

प्रत्येक महिन्याला पाचजणांचा मृत्यू

गेल्या पाच वर्षात या महामार्गावर 1027 अपघात झाले आहेत. त्यात 314 जणांचा मृत्यू झाला आहे. 1280 नागरिक जखमी झाले आहेत. तर 1 जानेवारी 2024 ते 31 जुलै 2031 या सात महिन्याच्या कालात महामार्गावर 91 अपघात झाले आहेत. त्यात 36 जणांचा मृत्यू झाला आहे. 108 जखमी झाले आहेत. एका महिनाभरात सुमारे पाच जणांचा बळी या महामार्गावर जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT