नाते: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्णत्वाला जाणार तरी कधी? असा संतप्त सवाल आता स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या महामार्गाच्या कामाला अद्याप अपेक्षित गती मिळत नसल्याने प्रवासी, वाहनचालक, व्यापारी आणि स्थानिक नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत.
दरवर्षी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महामार्गाचे काम पूर्ण करण्याची आश्वासने दिली जातात; मात्र गणपती विसर्जनानंतर ही आश्वासने हवेत विरून जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
गणपती आले की नेत्यांची धावपळ, उत्सव संपला की सर्वजण शांत! कोकणातील गणेशोत्सव हा लाखो चाकरमान्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना महामार्गावरील खड्डे, माणगांव तसेच इंदापूर येथील वाहतूक कोंडी, अपूर्ण रस्ते आणि धुळीचा सामना करावा लागतो.
प्रत्येक वर्षी गणेशोत्सवापूर्वी लोकप्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणांकडून महामार्गाचे काम लवकर पूर्ण करण्याची आश्वासने दिली जातात. मात्र, उत्सव संपल्यानंतर कामाचा वेग पुन्हा मंदावल्याचे चित्र दिसत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
महामार्गावरील अपूर्ण कामांमुळे अपघातांचा धोका, वाहतूककोंडी आणि प्रवासाचा वाढलेला वेळ या समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. याचा स्थानिक व्यवसायांवरही परिणाम होत आहे.
त्यामुळे केवळ आश्वासनांऐवजी प्रत्यक्ष कामाला गती देण्याची मागणी जोर धरत आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या तोंडावर आश्वासनांची पुनरावृत्ती करण्यापेक्षा महामार्गाचे काम प्रत्यक्षात पूर्ण करून दाखवावे.
गणपतीच्या आगमनापूर्वी दिलेली आश्वासने पुढील गणपतीपर्यंत कागदावरच राहणार का? असा सवाल उपस्थित करत स्थानिक नागरिकांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने आता तरी जबाबदारी स्वीकारून महामार्गाचे काम पूर्णत्वास न्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
अधिकाऱ्यांकडून केवळ वेळकाढूपणा?
महामार्गाच्या कामाला विलंब का होत आहे, कोणत्या ठिकाणी काम रखडले आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी नेमकी किती मुदत लागणार आहे, याबाबत स्पष्ट माहिती नागरिकांना मिळणे आवश्यक आहे. संबंधित अधिकारी पाहणी करतात, बैठका होतात आणि आश्वासने दिली जातात; मात्र कामाच्या गतीत अपेक्षित बदल दिसत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
नागरिकांच्या ठोस मागण्या कोणत्या?
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, प्रत्येक टप्प्याच्या कामाची अंतिम मुदत निश्चित करावी, संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या कामाचा नियमित आढावा घ्यावा तसेच अपूर्ण सेवा रस्ते, गटारे आणि धोकादायक ठिकाणांची कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.