महाड: मुंबई-गोवा महामार्गाचे काम 14-15 वर्षांपासून रखडले आहे. अद्याप महामार्ग पूर्ण झालेला नसताना खारपाडा येथे टोल वसुली सुरू केल्याने कोकणवासीय संतप्त झाले आहेत.यावर राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले यांनी स्पष्ट भूमिका मांडली.
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “रस्त्याचे काम 100% पूर्ण झाल्याशिवाय टोल आकारणी करू नये, हे शासनाचे धोरण आहे. असे असताना खारपाडा टोलनाका सुरू झाला असेल तर त्याची माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल.”
बोलत असताना मंत्री भरत शेठ म्हणाले, “अपूर्ण कामावर टोल वसूल करणे चुकीचे आहे. आधी सुविधा, मगच टोल. काम पूर्ण झाल्याशिवाय टोल नको ही जनतेची रास्त मागणी आहे आणि शासन त्याच्याशी सहमत आहे. आमची देखील हीच भावना आहे. त्यामुळे धोरण डावलून टोल सुरू केला असल्यास संबंधित यंत्रणेकडून अहवाल मागवला जाईल.” असे मंत्री भरत शेठ म्हणाले.
यावर स्थानिकांमधून देखील संताप व्यक्त होत असून खड्डेमय रस्ता, अपुरे पूल, वाहतूक कोंडी सोसत कोकणात जावे लागते. सुविधा न देता टोल कशासाठी, असा सवाल प्रवासी विचारत आहेत. खारपाडा टोल सुरू झाल्याने रायगडसह संपूर्ण कोकणात नाराजीचा सूर आहे.