Mumbai Goa Highway Sukeli Khind bus mishap
नागोठणे : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग वरील सुकेळी खिंडीत शुक्रवारी (दि. 3) पहाटे भीषण अपघात झाला. खाजगी लक्झरी बस पलटी झाल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. तर 21 प्रवासी जखमी झाले आहेत.
नागोठणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पनवेल (मुंबई) येथून गोव्याकडे सुमारे 45 प्रवाशांना घेऊन जाणारी ‘ओमकार ट्रॅव्हल्स’ची बस (क्र. एमपी 13 झेडपी 4545) पहाटे साडेदोनच्या सुमारास सुकेळी खिंडीत पोहोचली. यावेळी चालक हेमंत कुमार पाटील (वय 36) याने बस अतिवेगात चालवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याने खिंडीतील चढावावरील वळणावर नियंत्रण सुटून बस रस्त्याच्या डाव्या बाजूस पलटी झाली.
या अपघातात निलम विभूते आणि नईम निजाम शेख यांचा जागीच मृत्यू झाला, तर 21 प्रवासी जखमी झाले. जखमींना तात्काळ नागोठणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार देऊन पुढील उपचारासाठी पनवेल-कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच नागोठणे पोलिस, स्थानिक ग्रामस्थ, बचाव पथक तसेच फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आणि मदतकार्य तातडीने सुरू करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.