माणगाव : कमलाकर होवाळ
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ अंतर्गत माणगाव-इंदापूर बायपासचे काम गतीमान होईल आणि किमान एक लेन ३१ मे २०२६ पूर्वी सुरू होईल, असे आश्वासन खा. सुनील तटकरे यांनी दिले होते. मात्र प्रत्यक्षात माणगाव व इंदापूर येथील बायपास मार्गावरील अनेक ठिकाणी पुलांच्या कामाला अद्याप सुरुवातही झालेली नाही. तर काही ठिकाणी पर्यायी रस्त्यांची कामे अद्याप अपूर्णच असल्याने प्रवाशांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत.
माणगाव-इंदापूर बायपासच्या कामाबाबत दिलेली आश्वासने आणि प्रत्यक्षातील परिस्थिती यामधील दरी दिवसेंदिवस अधिक स्पष्ट होत असून, शासन यंत्रणा आणि ठेकेदारांच्या निष्क्रियतेचा फटका थेट सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.
परिणामी, मुंबई-गोवा महामार्गावर दररोज वाहतूक ठप्प होत असून ‘विकासाचा मार्ग’ म्हणून ओळखला जाणारा हा महामार्ग आता नागरिकांच्या दैनंदिन हालअपेष्टांचे प्रतीक बनला आहे.
इंदापूर व माणगाव येथे माणगाव बायपास कामाचा भूमिपूजन सोहळा ३ ऑक्टोबर २०२५ रोजी खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते पार पडला होता. यावेळी बायपासचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. वाढत्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक व व्यापाऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन काम गतीने पूर्ण केले जाईल, असेही सांगण्यात आले होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून महामार्गाचे काँक्रिटीकरण सुरू असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र दिलेल्या आश्वासनांनंतरही प्रत्यक्ष प्रगती अत्यंत संथ असल्याचे चित्र समोर आले आहे. सध्या माणगाव-इंदापूर दरम्यान चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागणे ही नित्याची बाब झाली आहे.
विशेषतः शनिवार-रविवार, सणासुदीचे दिवस, सुट्यांचा काळ तसेच लग्नसराईत परिस्थिती अधिकच बिकट होते. होळीच्या काळात खाजगी वाहनांची वाढलेली संख्या, बाजारपेठेतील गर्दी आणि एसटी बसची वर्दळ यामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे दिसून आले.
या वाहतूक कोंडीमागील प्रमुख कारणे म्हणजे अपूर्ण बायपास रस्ते, गोद नदीवरील पूल, कोकण रेल्वेवरील उड्डाणपूल आणि इतर आवश्यक संरचनात्मक कामे अद्याप पूर्ण न होणे. संबंधित अभियंत्यांच्या मते, ही कामे पूर्ण होण्यासाठी किमान एक वर्षाचा कालावधी लागू शकतो. पावसाळ्यामुळे हा कालावधी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, सध्या सुरू असलेली कामे पाहता ३१ मेपर्यंत बायपास सुरू होणे अशक्यप्राय आहे. पुलांचे काम, भराव आणि सर्व्हिस रोड बांधण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेता मुदत पूर्ण होण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम व नाराजीचे वातावरण आहे.
दरम्यान, महामार्गाचे काम पूर्ण न होता टोलवसुली सुरू करण्याच्या हालचालीमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “अपूर्ण रस्ता आणि पूर्ण टोल” या धोरणावर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
वाहतूक कोंडी वाढण्यामागे निजामपूर मार्गे पुण्याकडे जाणारी वाहतूक, माणगाव बसस्थानकातील एसटी बसची सततची ये-जा, अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणातील वर्दळ तसेच किरकोळ अपघात आणि वाहनचालकांमधील वाद ही कारणेही ठरत आहेत.
या पार्श्वभूमीवर पर्यायी उपाययोजनांची मागणी जोर धरू लागली आहे. पनवेल-खेड, पनवेल-चिपळूण आणि पनवेल-चीर या मार्गांवर अतिरिक्त लोकल रेल्वे सेवा सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे. खोपोली, पाली, निजामपूर, महाड मार्गे वाहतूक वळवणे तसेच माणगाव शहरातील अंतर्गत रस्त्यांवरून वाहतूक डायव्हर्ट करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.
याशिवाय, अवजड वाहनांना दिवसा बंदी घालून रात्रीच्या वेळेतच वाहतुकीस परवानगी द्यावी, अशी मागणीही पुढे येत आहे.
८ मे २०२५ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत वरिष्ठ अभियंत्यांची रखडलेल्या माणगाव बायपाससंदर्भात महत्त्वाची बैठक ‘नवीन आनंद भुवन’ हॉटेलमध्ये पार पडली होती. त्या वेळी उपस्थित अभियंत्यांनी स्पष्ट केले की, किमान तीन वर्षे तरी माणगाव-इंदापूर बायपासचे काम पूर्ण होऊ शकत नाही, कारण पावसाळ्यात कामाची गती मंदावते.
माहितीच्या अधिकाराखालीही अशी माहिती देण्यात आली होती की, एक वर्षानंतर बायपास मार्गावरून वाहतूक सुरू होईल. मात्र खा. सुनील तटकरे यांनी ३१ मेनंतर माणगाव बायपास एकेरी मार्गाने वाहतुकीसाठी खुला होईल, असे जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी काम अपूर्ण असल्याने वाहतूक सुरू होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.डॉ. मोहन दोशी, सामाजिक कार्यकर्ते, माणगाव