

-महापौर रितू तावडे यांचे आश्वासन
-दि बीईएसटी वर्कर्स युनियनसमवेत बैठक
मुंबई : बेस्ट कर्मचार्याच्या प्रलंबित मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ,असे आश्वासन मुंबई महापालिका महापौर रितू तावडे यांनी शुक्रवारी येथे दिले.बेस्ट कर्मचार्यांच्या मागण्यांसाठी दि बीईएसटी वर्कर्स युनियन समवेत अधिकारी,पदाधिकारी यांची महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील सभागृहात बैठक झाली.त्यावेळी त्या बोलत होत्या.बैठकीला उपमहापौर संजय घाडी,सभागृह नेते गणेश खणकर,स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव,अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी,शिवसेना (शिंदे गट) गटनेते अमेय घोले,वर्कर्स युनियन सरचिटणीस शशांक राव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी वर्कर्स युनियनने प्रलंबित मागण्यांचे निवेदन महापौरांना दिले
बेस्ट उपक्रमातील कार्यरत कर्मचारी,सेवानिवृत्त कर्मचारी व खाजगी कंत्राटदारामार्फम तथाकथित वेट लीज पद्धतीने चालविणार्या बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यावर कार्यरत कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ही बैठक झाली.युनियनने सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्यांची ग्रॅज्युइटीची पुर्ण रक्कम तातडीने द्यावी,तसेच भविष्यकाळात सेवानिवृत्त होणार्या कर्मचार्यांची देयके,रक्कम तातडीने मिळावी यासाठी राखीव निधी ठेवावा, पदोन्नती ,रिक्त जागा,अंतिम देयके,अनुकंपा तत्वावरील नोकर्या आणि इतर प्रश्नावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा,मुंबई महापालिकेच्या बेस्ट उपक्रमाशी संबधित क अर्थसंकल्पाचे विलिनीकरण महापालिकेच्या अर्थसंकल्पात करावे,उपक्रमाच्या विद्युत पुरवठा विभागात २०१० व २०२४ मध्ये व नंतर कायम करण्यात आलेल्या हंगामी कामगारांना ते सेवेत दाखल झाल्याच्या दिनाकांपासून पुर्वलक्षी प्रभावाने नोकरीत कायम असल्याचे मानून वेतननिश्चिती करुन त्यांच्या वेतनातील विसंगती दूर करावी आदी मागण्या बैठकीत करण्यात आल्या.
या मागण्यां संदर्भात महापालिका व बेस्ट उपक्रमाच्या संबधित अधिकार्यांना वर्कर्स युनियन व संघर्ष कामगार कर्मचारी युनियनबरोबर चर्चा करावी व यावर निर्णय घेण्याचे आदेश द्यावेत असे वर्कर्स युनियन सरचिटणीस शशांक राव यांनी यावेळी सांगितले.या बैठकीत चर्चेनंतर महापौर रितू तावडे यांनी,बेस्ट कर्मचार्यांच्या मागण्यावर सकारात्मक निर्णय घेऊ,असे आश्वासन बैठकीत दिले.