Mumbai Goa Highway Bypass Pudhari
रायगड

Mumbai Goa Highway Bypass: माणगाव बायपास गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करा; भरत गोगावले यांचे अधिकारी, ठेकेदाराला निर्देश

महामार्गांच्या कामांची पहाणी

पुढारी वृत्तसेवा

कमलाकर होवाळ

माणगाव: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव बायपासच्या रखडलेल्या कामाची रोहयो मंत्री भरतशेठ गोगावले यांनी शनिवारी प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा आढावा घेतला. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या लाखो चाकरमान्यांना आणि प्रवाशांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागू नये, यासाठी माणगाव आणि इंदापूर बायपासच्या किमान एकेरी मार्गाचे काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांना दिले.

कोकणाचा सर्वात मोठा आणि भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा सण असलेला गणेशोत्सव अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. दरवर्षी या काळात मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर भागांतून लाखो कोकणवासी आपल्या गावी दाखल होत असतात.

मात्र मुंबई-गोवा महामार्गावरील विविध ठिकाणी सुरू असलेली कामे, अपूर्ण बायपास आणि अरुंद मार्ग यामुळे प्रवाशांना अनेक तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागते. विशेषतः माणगाव आणि इंदापूर परिसरात निर्माण होणारी वाहतूक कोंडी ही कोकणवासीयांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आली आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्री गोगावले यांनी माणगाव बायपासच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करताना संबंधित यंत्रणेला कामाचा वेग वाढविण्याच्या सूचना दिल्या.

ठेकेदारांच्या काही तांत्रिक व प्रशासकीय अडचणी असल्यास त्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक भूमिका घेईल, मात्र काम वेळेत पूर्ण होणे हीच सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मागील काही वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गावरील कामांमुळे कोकणात येणाऱ्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेकदा वाहनांच्या किलोमीटरच्या रांगा लागून प्रवाशांना तासन्तास महामार्गावर अडकून राहावे लागते. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी माणगाव व इंदापूर बायपासचा एकेरी मार्ग सुरू झाल्यास वाहतूक सुरळीत होण्यास मोठी मदत होणार असून कोकणात येणाऱ्या लाखो गणेशभक्तांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कामात दिरंगाई नको

“गणेशोत्सवापूर्वी किमान एकेरी मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला पाहिजे. यामध्ये कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा त्यांनी ठेकेदारांना दिला. पाहणीदरम्यान त्यांनी महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, अभियंते आणि ठेकेदार यांच्याशी चर्चा करून कामातील अडथळे आणि अडचणी जाणून घेतल्या. प्रशासनाच्या स्तरावर आवश्यक ते सहकार्य करण्याची तयारी दर्शविताना, काम पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधितांनी समन्वयाने कार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.

कामाला गती मिळण्याची आशा

मंत्री गोगावले यांच्या या पाहणीनंतर माणगाव आणि इंदापूर बायपासच्या कामांना नव्याने गती मिळेल, तसेच यंदाच्या गणेशोत्सवात महामार्गावरील वाहतूक कोंडीचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होईल, अशी आशा कोकणवासीया कडून व्यक्त करण्यात येत आहे. या पाहणी दौऱ्यावेळी महामार्ग प्राधिकरणाचे संबंधित अधिकारी, अभियंते, ठेकेदार प्रतिनिधी आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. मंत्री गोगावले यांनी ठेकेदाराला गणेशोत्सवापर्यंत किमान एकेरी मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्याचे स्पष्ट आदेश देत काम वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT