Poladpur Fish Container Overturns Pudhari
रायगड

Mumbai Goa Highway Accident | मुंबई-गोवा महामार्गावर मासळी वाहतूक करणारा कंटेनर पलटी, अग्निशमन दलाच्या तत्परतेने धोका टळला

पोलादपूर हद्दीतील धामणदेवी गावाजवळ अपघात: चालक किरकोळ जखमी, वाहतूक सुरळीत

पुढारी वृत्तसेवा

Poladpur Fish Container Overturns

पोलादपूर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर पोलादपूर हद्दीतील धामणदेवी गावाजवळ सोमवारी (दि.२८) दुपारी मासळी वाहतूक करणारा कंटेनर पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातात कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला असून, त्याला पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, कंटेनरच्या डिझेल टँकजवळून धूर निघत असल्याने काही काळ महामार्गावरील वाहतूक एकेरी मार्गाने सुरू ठेवण्यात आली.

सोमवारी दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास अलिबाग येथून मासळी घेऊन रत्नागिरीच्या दिशेने जाणारा कंटेनर (एमएच ०४ जेके ०३८१) धामणदेवी गावाजवळील कशेडी घाट परिसरात अचानक पलटी झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पोलिस उपनिरीक्षक सतीश पवार, वाहतूक पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले. जखमी चालकाला तत्काळ रुग्णवाहिकेतून पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.

दरम्यान, पलटी झालेल्या कंटेनरच्या डिझेल टँकजवळून धूर निघत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन पोलिसांनी खबरदारी म्हणून सुमारे दीड किलोमीटर अंतरावरील वाहतूक एकेरी मार्गाने सुरू ठेवली. महाड एमआयडीसीच्या अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन जवानांनी कंटेनरवर तसेच रस्त्यावर पाण्याचा मारा करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त कंटेनर रस्त्याच्या बाजूला करण्यात आला. पोलिसांच्या तत्पर उपाययोजनांमुळे संभाव्य आग अथवा मोठा अनर्थ टळला. काही काळ विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यात आली.

या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसून चालक किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. अपघाताचे नेमके कारण समजू शकले नसून, याबाबत पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT