मुंबईतून दुबई सिंगापूर मलेशिया मालदिवला क्रूझ धावणार 
रायगड

Mumbai Cruise Terminal : मुंबईतून दुबई सिंगापूर मलेशिया मालदिवला क्रूझ धावणार

मुंबईत एकाचवेळी 5 क्रूझ पार्क होणार; 10 लाख पर्यटक प्रवास करू शकणार

पुढारी वृत्तसेवा

ऋषिता तावडे

अलिबाग : भारतीय पर्यटनाला नवी दिशा देणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रूझ टर्मिनल सुरू झाले असून सिंगापूर मलेशिया थायलंड दुबई मालदिव श्रीलंका लक्षद्वीप कोची आणि गोवा अशा नऊ पर्यटन स्थळांची सफर या क्रूझ सेवेतून होणार आहे. एकूण पाच क्रूझ मुंबईच्या टर्मिनलवर एकाचवेळी पार्क होऊ शकणार आहेत. या सेवेमुळे देशांतर्गत आणि परदेशी पर्यटनालाही मोंठी चालना मिळू शकेल.

देशातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल मुंबई येथे सुरू झाला आहे. या टर्मिनलवर एकाचवेळी 5 क्रूझ पार्क होण्याची क्षमता आहे. या आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलमधून मुंबईतून गोवा, कोची, लक्षद्वीप, श्रीलंका, मालदीव, दुबई, सिंगापूर, मलेशिया, थायलंड अशा ठिकाणी क्रूझेसने पर्यटनाला जाता येईल. या क्रूझमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटनाच्या सुविधा देण्यात आल्या असून या क्रूझ टर्मिनलचे पहिले दोन मजले 2 लाख 7 हजार स्क्वेअर फूट असणार आहेत. त्यामुळे पर्यटकांना सर्व प्रकारच्या सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.

मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल असे या टर्मिनलचे नाव आहे. यासाठी 556 कोटी र्ख्चा करण्यात आले आहेत. समुद्राच्या लाटांना सामना करण्यासाठी क्रूझची रचना छतासारखी करण्यात आली आहे. भारताच्या क्रूझ पर्यटन क्षेत्राला मोठी चालना देणारा असा हा प्रकल्प आहे. एमआयसीटी हे भारतातील सर्वात मोठे जागतिक दर्जाचे क्रूझ टर्मिनल आहे. या क्रूज टर्मिनलचे पहिले दोन मजले 207,000 चौरस फूट क्षेत्रात पसरलेले आहेत. येथे 72 चेक-इन आणि इमिग्रेशन काउंटर आहेत. नव्याने बांधलेले एमआयसीटी दरवर्षी अंदाजे 10 लाख प्रवाशांना हाताळण्याची क्षमता बाळगून आहे. तशा पद्धतीची संपूर्ण रचना या क्रूझची आहे. याला भारतीय क्रूझ पर्यटनाचे प्रवेशद्वार म्हटले जाते.

सरकारने क्रूझ इंडिया मिशन अंतर्गत हे टर्मिनल जागतिक मानकांनुसार विकसित केले आहे. 4,15,000 चौरस फूट क्षेत्रफळ असलेले, हे टर्मिनल दरवर्षी 10 लाख प्रवाशांना हाताळण्यास सक्षम आहे. एकाच दिवशी 15 हजार पर्यटक या क्रूझमधून प्रवास करू शकणार आहेत. या प्रकल्पांचे उद्दिष्ट सांस्कृतिक पर्यटनाला चालना देणे आणि प्रदेशात पर्यावरणीय शाश्वतता मजबूत करणे असल्याने एमआयसीटी भारताच्या क्रूझ पर्यटन क्षेत्राला मोठी चालना देईल, अशी अपेक्षा आहे. मुंबई ही ऐतिहासिकदृष्ट्या समुद्री व्यापाराचे प्रमुख केंद्र राहिले आहे. 1690 पासून सुरू झालेला हा वारसा 1873 मध्ये बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या (आता मुंबई पोर्ट अथॉरिटी) स्थापनेने अधिक सशक्त झाला. आता या वारशाला पर्यटनाच्या दृष्टीने नवी दिशा देण्यासाठी केंद्र सरकारने मुंबईला ‌‘क्रूझ हब‌’ बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, त्याचा महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे हे टर्मिनल.

या क्रूज टर्मिनलवर एकाच वेळी पाच जहाजे उभी राहू शकतात. याची लांबी 11 मीटर आणि लांबी 300 मीटरपर्यंत आहे. पार्किंगमध्ये एकाच वेळी 300 हून अधिक वाहने पार्क केली जाऊ शकतात. एमआयसीटी प्रकल्पात एकूण 556 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. एमआयसीटीची रचना लहरी छताने करण्यात आली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचे बांधकाम 2018 मध्ये सुरू झाले. ते अंदाजे 4.15 लाख चौरस फूट क्षेत्रात पसरलेले आहे. या टर्मिनलमध्ये 22 लिफ्ट, 10 एस्केलेटर आहेत. विशेष म्हणजे हे टर्मिनल एका वेळी 2 मोठ्या क्रूझ जहाजांना सहजपणे हाताळू शकते. या क्रूज टर्मिनलचे डिजाईन अतिशय भव्य आणि सुंदर आहे. याचे प्रवेशद्वार मुंबईच्या वारशापासून प्रेरणा घेत असल्याचे दिसून येते. याच्या छताचा आकार या समुद्राच्या लाटांप्रमाणे आहे. येथे प्रवाशांसाठी खास आसन व्यवस्था तसेच सेल्फी पॉइंट्स असणार आहे.

क्रूझमध्ये पर्यटकांसाठी हॉटेल, भोजन, मनोरंजन, वाहतूक - सर्व सुविधा एका जहाजावरच उपलब्ध असतात. प्रवास करतानाच लक्झरी रिसॉर्टसारखा अनुभव मिळतो. क्रूझवर थिएटर शो, डिस्को, कॅसिनो, स्विमिंग पूल, स्पा, योगा, जिम अशा सुविधा असतात तसेच सनसेट, डिनर, डान्स परफॉर्मन्स, लाईव्ह म्युझिक यामुळे प्रवास कंटाळवाणा वाटत नाही. यामुळे पर्यटनाचा नवा दृष्टीकोन मिळतो समुद्रातून किनारपट्टीचे सुंदर दृश्य अनुभवता येते. स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग, डॉल्फिन स्पॉटिंग यासारखे ॲडव्हेंचर पर्यटन निर्माण होत आहे. विविध देश व संस्कृती जवळून पाहण्याची संधी मिळत असते. तसेच पॅकेजेसमध्ये भोजन, राहणी, शो यांचा समावेश असल्यामुळे वेगळा खर्च कमी होतो. एका ठिकाणी राहूनही अनेक गंतव्यांचा अनुभव घेता येतो, त्यामुळे वेळ वाचतो. जहाजावर आंतरराष्ट्रीय प्रवाशांशी ओळख व संवाद साधता येतो. विविध देशांच्या खाद्यसंस्कृती व परंपरा अनुभवता येतात. तसेच आधुनिक क्रूझ जहाजे असल्यामुळे आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानके, डॉक्टर्स, हेल्थ सेंटर उपलब्ध आहेत.

भारतातील महत्त्वाची क्रूझ टर्मिनल्स

1. मुंबई - हे भारतातील सर्वात मोठे आणि अत्याधुनिक क्रूझ टर्मिनल आहे. गेटवे ऑफ इंडिया जवळ, सुमारे 10 लाख प्रवाशांची क्षमता.

2. मंगलुरू - येथे परदेशी क्रूझ जहाजे वारंवार थांबतात.

3. कोची आंतरराष्ट्रीय क्रूझसाठी प्रसिद्ध.पर्यटनस्थळांच्या जवळ असल्यामुळे प्रवाशांना सोयीचे.

4. गोवा - येथे एक आधुनिक क्रूझ टर्मिनल आहे. परदेशी प्रवाशांसाठी गोव्याच्या पर्यटनाचा मुख्य प्रवेशद्वार.

5. चेन्नई - पूर्व किनाऱ्यावरचे एक महत्त्वाचे टर्मिनल.

6. विशाखापट्टणम्‌‍ - नवीन विकसित होत असलेले क्रूझ टर्मिनल.

7. कोलकाता हुगळी नदीकाठचा क्रूझ टर्मिनल.गंगा नदी क्रूझसाठी विशेष.

8. पोरीबंदर, ओखामंडळ, आणि लक्षद्वीपपर्यटनाला चालना देण्यासाठी लहान पण विकसित होत असलेली टर्मिनल्स

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT