

मुंबई : गुजरातच्या भावनगरमध्ये शनिवारी झालेल्या ‘समुद्र से समृद्धी’ या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील पहिल्यावहिल्या मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचे लोकार्पण केले. महाराष्ट्राच्या पर्यटनाला क्रूझ टर्मिनल क्षेत्राची जोड यामुळे मिळाली असून, मुंबईच्या या टर्मिनलवर आता नियमित आंतरराष्ट्रीय पर्यटन जहाजे येत राहतील.
इंदिरा डॉकमध्ये उभारलेले हे आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल म्हणजे क्रूझ भारत मिशनचा भाग असून, आंतरराष्ट्रीय क्रूझ पर्यटनात मजबूत पाय रोवण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल पडले आहे. बॅलार्ड पीअर हे जुने टर्मिनल हटवून तिथे हे नवे टर्मिनल सुरू झाले आहे. तब्बल 4 लाख 15 हजार चौरस फूट परिसरात उभारलेल्या या मुंबई आंतरराष्ट्रीय टर्मिनलवरून वर्षाला 10 लाख प्रवासी प्रवास करू शकतील आणि एका वेळी पाच टोलेजंग पर्यटक जहाजे इथे नांगर टाकू शकतील.
कोरोना महामारीनंतरच्या काळात मुंबईत 100 हून अधिक क्रूझ जहाजे आली आणि वर्षाला अडीच लाखाहून अधिक प्रवाशांनी जहाज प्रवास केला. मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल सुरू झाल्याने ही संख्या आता झपाट्याने वाढेल, अशी आशा आहे.
शनिवारी या टर्मिनलचे लोकार्पण होत असताना मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलवर कॉर्डिलिया क्रूझ दाखल झालेली होती आणि प्रवासी या जहाजावर आपले सामान घेऊन चढू लागले होेते.
एखाद्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लाजवेल असा मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचा नजारा आहे. 556 कोटी रुपये खर्चून हे टर्मिनल उभारण्यात आले आहे.
जहाजाने आंतरराष्ट्रीय प्रवास करणार्या प्रवाशांसाठी इथे तब्बल 72 इमिग्रेशन काऊंटर्स असून, आपल्या जहाजाची वाट बघत बसणारे प्रवासी काचेच्या भिंतींमधून समुद्राचा आनंद लुटू शकतात.
या संपूर्ण टर्मिनलमध्ये सर्वत्र प्रवाशांसाठी निळ्या रंगाचे बाकडे बसवलेले आहेत. समुद्राच्या निळाईशी ते नाते सांगतात.