दहा नगरपालिकांसाठी रायगडात बहुरंगी लढत pudhari photo
रायगड

Raigad local body elections : दहा नगरपालिकांसाठी रायगडात बहुरंगी लढत

नगराध्यक्षपदांसाठी 59 अर्ज तर सदस्यपदांसाठी तब्बल 900 अर्ज दाखल; शेवटच्या दिवसात 556 अर्ज

पुढारी वृत्तसेवा

अलिबागः रायगड जिल्ह्यातील 10 नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बहुरंगी लढती अपेक्षित आहे.अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी 10 नगराध्यक्षपदांसाठी 59 तर नगरसेवकपदांसाठठी 900 अर्ज दाखल झालेले आहेत. मंगळवारी अर्जाची छाननी होणार आहे. त्यानंतर माघारीनंतरच निवडणुकीचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे. काँग्रेस, दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी, शेकाप, मनसे, रिपाइं, प्रहार या प्रमुख राजकीय पक्षांसह स्थानिक आघाड्यांनीही अर्ज दाखल केलेले आहेत.

नगरपरिषदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी सदस्य पदासाठी 520 तर नगराध्यक्ष पदासाठी 36 असे एका दिवसात तब्बल 556 अर्ज दाखल झाल्याने प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली. आतापर्यंत एकूण 59 नगराध्यक्ष पदांचे अर्ज आणि 900 नगरसेवक पदांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यातील 10 नगरपरिषदांमधून एकूण 217 सदस्य पदे निवडली जाणार आहेत. त्यासाठी आजपर्यंत 520 उमेदवारांनी अर्ज दाखल केले, तर एकूण 900 अर्जांची पडताळणी प्रक्रियाही सुरू आहे.

नगरपालिकांमधील उमेदवारी अर्ज

खोपोली : सदस्य सर्वाधिक 188 अर्ज; नगराध्यक्ष पदासाठी 7 अर्ज, अलिबाग : सदस्य 75, नगराध्यक्ष 6 अर्ज, श्रीवर्धन : सदस्य 68, नगराध्यक्ष 5, मुरुड-जंजिरा : सदस्य 74, नगराध्यक्ष 5, रोहा : सदस्य 78, नगराध्यक्ष 3, महाड : सदस्य 74, नगराध्यक्ष 7, पेण : सदस्य 103, नगराध्यक्ष 5, उरण : सदस्य 78, नगराध्यक्ष 9, कर्जत : सदस्य 92, नगराध्यक्ष 9, माथेरान : सदस्य 70, नगराध्यक्ष 4, आतापर्यंत 59 नगराध्यक्षपदासाठी तर 900 सदस्यपदांसाठी अर्ज दाखल झाले असले तरी छाननी आणि अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत खरे चित्र स्पष्ट होईल़

ठाणे-पालघरात सेना-भाजप आमनेसामने

ठाणे : युती न झाल्याने ठाणे-पालघरात सेना-भाजप आमनेसामने आले आहेत. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ आणि बदलापूर या प्रतिष्ठेच्या नगरपालिकेमध्ये 59 जागांसाठी 169 उमेदवार तर नगराध्यक्ष पदासाठी बाराजणांनी अर्ज दाखल केले. तर बदलापूरमध्ये 49 जागांसाठी शंभरपेक्षा जास्त अर्ज दाखल झाले आहेत. अंबरनाथच्या नगराध्यक्ष पदासाठी राजकीय पक्षांतर्फे पाच उमेदवारांनी तर सात अपक्षांनी अर्ज भरले आहेत. मात्र येथे सत्तारूढ भाजप शिवसेनेत खरी लढत आहे. बदलापूरमध्येही शिवसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. युती न झाल्याने ठाणे-पालघरात सेना-भाजप आमनेसामने आले आहेत.

थेट जनतेमधून होणाऱ्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असून या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजपा अशी थेट लढत होणार आहे. या निवडणुकीत उबाठा, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि मनसे या तिन्ही पक्ष्यांची युती झाल्याने व मनसे चे सर्व उमेदवार मशाल चिन्हावर लढणार असल्याने शिवसेनेसाठी ही युती डोकेदुखी ठरणार आहे. पालघर जिल्ह्यात पालघर, डहाणू, जव्हार या तीन नगरपरिषद व वाडा नगरपंचायतीसाठी सेना-भाजप आमनेसामने आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT