रायगड

MSEDCL Electricity: थकीत वीजबिलांवर महावितरणची कारवाई; 4 महिन्यांत 30 हजार कनेक्शन खंडित

रायगड जिल्ह्यात वसुली मोहीम; ग्राहकांनी वेळेवर बिल भरण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

रायगड : वीज सेवा सुरळीतपणे पुरवूनही अनेक ग्राहकांकडून वेळेवर वीज बिलाचा भरणा होत नाही. त्यामुळे महावितरण कंपनीच्या महसुलावर ताण येत आहे. थकीत बिलांची वाढती रक्कम लक्षात घेता महावितरणने कडक कारवाईचा अवलंब करत गेल्या 4 महिन्यांत 30 हजार 371 ग्राहकांचे वीज कनेक्शन खंडित केले आहेत.

रायगड सर्कल अंतर्गत अलिबाग, पनवेल, रोहा आणि गोरेगाव हे चार विभाग असून, त्याअंतर्गत 17 उपविभाग कार्यरत आहेत. या विभागांमार्फत जिल्ह्यातील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. वीज पुरवठा खंडित झाल्यास तो तातडीने पूर्ववत करण्यासाठी यंत्रणा सज्ज असते. दर महिन्याला वापरानुसार ग्राहकांना बिल वितरित केले जाते. काहींना ऑनलाईन माध्यमातून तर काहींना कागदी स्वरूपात बिल दिले जाते. मात्र, काही ग्राहकांकडून सातत्याने बिल भरण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून आले आहे. महावितरणचे अधीक्षक अभियंता धनराज बिक्कड यांच्या मार्गदर्शनाखाली थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. त्याअंतर्गत नोव्हेंबरमध्ये 9 हजार 965, डिसेंबरमध्ये 6 हजार 286, जानेवारीमध्ये 6 हजार 650 आणि फेब्रुवारीमध्ये 7 हजार 580 अशा एकूण 30 हजार 371 ग्राहकांचे वीज कनेक्शन बंद करण्यात आले. नागरिकांनी वेळेवर बिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन अधीक्षक अभियंता धनराज बिक्कड यांनी केले आहे.

जिल्ह्यात विविध पथके तयार करून थकीतदारांकडून वसुलीचे काम सुरू करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महावितरणचे कर्मचारी थकीत ग्राहकांकडून वीजबिल वसूल करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. बिल न भरणाऱ्या ग्राहकांविरोधात कडक कारवाईही केली जात आहे. फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यातील 7 हजार 580 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांनी तातडीने वीजबिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता धनराज बिक्कड यांनी केले आहे.

मागील काही महिन्यांपर्यंत दर महिन्याच्या तीन तारखेला महावितरण कंपनीचे कर्मचारी घराघरांत जाऊन मीटरची रीडिंग घेत असत आणि त्या आधारे वीज वापराचे बिल देत होते. तसेच ग्राहकांना वेळेवर बिल भरण्याचे आवाहनही करण्यात येत होते. मात्र, स्मार्ट मीटर प्रणाली लागू झाल्यानंतर कार्यालयातूनच रीडिंग आणि वीज वापराची माहिती घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

एका क्लिकवर वीज वापराची संपूर्ण माहिती महावितरण कंपनीला उपलब्ध होत असल्याने प्रत्यक्ष जाऊन मीटर रीडिंग घेण्याची गरज कमी झाली आहे. त्यामुळे मागील सहा महिन्यांपासून मीटर रीडिंग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. स्मार्ट मीटरमुळे त्यांच्या रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, या कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कंपनीच्या या विभागातील 4 कोटी 30 लाखांची थकबाकी दर महिन्याला वेळेवर भरण्याचे आवाहन महावितरण कंपनीकडून सातत्याने केले जाते. मात्र काही ग्राहकांकडून दर महिन्याला बिल न भरल्याने थकबाकी वाढत चालली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत लहान-मोठे उद्योग करणाऱ्या 5 हजार 64 ग्राहकांनी तब्बल चार कोटी तीस लाख रुपयांचे वीजबिल थकविले आहे. कारखानदारीचा व्यवसाय चालविणाऱ्या 285 ग्राहकांकडून एक कोटी साठ लाख रुपयांची थकबाकी आहे. तर घरगुती वीज वापर करणाऱ्या 19 हजार 970 ग्राहकांकडून आठ कोटी वीस लाख रुपयांचे वीजबिल थकीत आहे. अशा प्रकारे 14 कोटी 1 लाख रुपयांचे वीजबिल थकविले असून, त्याचा आर्थिक भार महावितरण कंपनीवर पडत आहे. मार्चअखेरपर्यंत ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरण कंपनीने मोहीम हाती घेतली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT