अलिबाग ः ऐन गणेशोत्सवात धुमाकुळ घालणार्या वरुणराजाला आता परतीचे वेध लागलेले आहेत.येत्या 19 सप्टेंबरपासून त्याचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे.मात्र परतीच्या प्रवासातही तो आपला इंगा दाखविण्याची शक्यता वर्तविली जात आहे.आगामी काळात येणारी दोन्ही नक्षत्रे ही पावसाचीच असल्याने ऐन नवरात्रौत्सवावरही पावसाचे सावट असण्याची शक्यता पंचांगातून व्यक्त केली जात आहे.
पंचांगानुसार उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचा कार्यकाल सुरू आहे. कोल्ह्यावर स्वार होऊन आलेल्या वरुणराजाने गेल्या चार दिवसात आपली चुणूकही दाखविली आहे. अजूनही पंचांग शास्त्राच्या आधारे 19 सप्टेंबरपर्यंत पावसाची शक्यता आहे. याशिवाय दि.23 ते 26 सप्टेंबरपर्यंतही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.
सध्या पित्रू पंधरवडा सुरू आहे.21 सप्टेंबरला मध्यरात्री12.17 मिनिटानी सर्वपित्री अमावस्या सुरु होणार आहे. 22 सप्टेंबरला मध्यरात्री 1 वाजून 17 मिनिटांनी तिचा कार्यकाल आहे.या दिवशी पाऊस विश्रांती घेऊन पुन्हा नव्या दमाने दि. 23 सप्टेेंबरपासून जोरात बरसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
वरुणराजा जोरकस हजेरी लावेल...
23 सप्टेंबरपासून राज्यात शारदीय नवरात्रौत्सव सुरू होत आहे.पुढील दहा दिवस हा उत्सव जोरात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो.पण याच उत्सवावर पावसाचे सावट असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.त्यामुळे गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रातही वरुणराजा जोरकस हजेरी लावेल,असा अंदाज आहे. याच दरम्यान 27 सप्टेंबरला नक्षत्र बदल होत आहे. हस्त नक्षत्राचा कार्यकाल सुरू होणार आहे.
यावेळी सूर्य मोरावर आरुढ होऊन येणार आहे.या काळात कोकण,पश्चिम महाराष्ट्र,मराठवाडा विभागात चांगला तर विदर्भात अतिवृष्टी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.पंचांग शास्त्रानुसार 29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या काळात पाऊस पडण्याची शक्यता आहे.याच दरम्यान, नवरात्रौत्सवाला बहर आलेला असतो. त्यामुळे नवरात्रालाही वरुणराजाची हजेरी लागणार हे नक्की.