

मुंबई : गोवंडी येथे राहणार्या शोएब तय्यबअल सय्यद नावाच्या एका 22 वर्षांच्या तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. याप्रकरणी त्याची प्रेयसी अरहमा हिच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तिच्यावर शोएबचा मानसिक व शारीरिक शोषण करून त्याला जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.
शोएब हा गोवंडीतील शिवाजीनगर, बैंगनवाडीमध्ये राहत होता. बेलापूर येथील एका खासगी कॉल सेंटरमध्ये तो कामाला होता. याच परिसरात राहणार्या अरहमासोबत त्याचे प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधाची दोन्ही कुटुंबियांना माहिती होती. गेल्या काही महिन्यांत शोएब घरात पगार न देता संपूर्ण पगार अरहमाला देत होता. त्याने तिला सोन्याची चैन आणि अनेक महागडे गिफ्ट दिले होते. तरीही त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद होत होते.
लग्नानंतर शोएबने त्याचे घर सोडावे आणि तिच्या पालकांच्या शेजारीच नवीन घर घ्यावे यासाठी ती त्याच्यावर दबाव आणत होती. गेल्या काही दिवसांपासून तिच्याकडून त्याचे प्रचंड मानसिक व शारीरिक शोषण सुरू होते. त्यामुळे शोएब हा प्रचंड मानसिक तणावात होता. गेल्या आठवड्यात त्याने अरहमाला 25 हजार रुपये दिले होते. यावेळी त्यांच्यात प्रचंड वाद झाला होता.
गेल्या आठवड्यात झालेल्या वादानंतर घरी आल्यानंतर शोएबने त्याच्या राहत्या घरी येऊन गळफास घेऊन जीवन संपवले. ही माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत तपास सुरू केला. याच दरम्यान शोएबची आई तोहराबी तय्यबअली सय्यदने अरहमाविरुद्ध शोएबच्या जीवन संपवण्यास जबाबदार असल्याचा आरोप करत तिच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली.