Paavsali Ranbhaji : पावसाळी रानभाज्‍यांमुळे आदिवसींना रोजगार  File Photo
रायगड

Paavsali Ranbhaji : पावसाळी रानभाज्‍यांमुळे आदिवसींना रोजगार

नागरिकांकडून वाढती मागणी; विविध प्रकारच्या भाज्या उरणच्या बाजारपेठेत दाखल

पुढारी वृत्तसेवा

Monsoon wild Ranbhaji provide employment to tribals

उरण : राजकुमार भगत

यावर्षी मे महिन्यातच पावसाळा सुरू झाल्याने रानभाज्या आणि कंद देखिल लवकर बाजारात विक्रीसाठी आले आहे. सध्या जंगलातील रानभाज्यानी बाजारपेठा फुलू लागल्या आहेत. पावसामुळे भाजीच्या मळ्यांचे मोठे नुकसान झाल्याने नेहमीच्या भाज्यांचे भाव वाढले आहेत. त्यामानाने या पावसाळ्यातील रानभाज्या या स्वस्त मिळत असल्याने त्यास ग्राहकांची चांगली मागणी आहे. यातून आदिवासी बांधवांना चांगला रोजगार उपलब्ध होत आहे.

उरण तालुका हा बहुतांश डोंगराळ आणि जंगलाने वेढलेला असल्याने या तालुक्यात अनेक दुर्मिळ आणि औषधी वनस्पती, फळे आणि रानभाज्या आढळतात. उन्हाळा संपून पावसाळ्याची चाहूल लागली की, या भागातील आदिवासी जंगल, डोंगर आणि माळरानात आढळणारे करांदे, हळदे या सारखे कंद गोळा करून त्याची पनवेल, उरण या सारख्या मोठ्या बाजारपेठात विक्री करून आपली उपजिविका करतात. तसेच शेवळा, टाकळा, कंटोळी, कोरळा, कुर्डू यासारख्या रानभाज्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने सध्या या भागातील बाजारपेठा या रानभाज्यांनी गजबजून गेल्या आहेत. या प्रकारच्या रानभाज्या या पावसाळ्यातच मिळत असल्याने खवय्यांना देखिल या रानभाज्यांचे वेध लागलेले असतात.

पावसाळ्यात बहुतांश आदिवासींना रोजगार नसल्याने तालुक्यातील बहुतेक आदिवासी पुरूष आणि स्त्रिया या रानभाज्या गोळा करण्याचा आणि विकण्याचा व्यवसाय करतात आणि त्यावरच त्यांचा दोन तिन महिने उदरनिर्वाह चालतो.

चिरनेर, वेश्वी, रानसई, कोप्रोली, आवरे, पुनाडे, सारडे तसेच उरण जवळील द्रोणागिरी डोंगरात अशा प्रकारच्या भाज्या आणि कंद मोठ्या प्रमाणात आढळतात. परंतु गेल्या काही वर्षापासून उरण तालुक्यात विकासाच्या नावाखाली प्रचंड प्रमाणात भरावांची कामे सुरू असल्याने या भागातील जंगले, डोंगर आणि माळराने पोखरून त्यांची माती या भरावांसाठी वापरत असल्याने या भागातील जंगल, डोंगर येथून मिळणार्‍या रानभाज्या आणि इतर कंदाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यामुळे पूर्वी एक दोन तासात गोळा करता येणा-या रानभाज्याना आता पूर्ण दिवस लागत असल्याची खंत या भागातील आदिवासी व्यक्त करत आहेत. त्यामुळे या भागातील आदिवासींच्या आअर्थिक उत्पन्नावर याचा परिणाम झाला आहे. तसेच या रानभाज्या कोणतेही खते आणि कीटकनाशकांच्या वापराशिवाय मिळत असल्याने या भाज्या पोष्टीक आणि औषधी असतात त्यामुळे शासनाने या भागातील जंगल आणि आदिवासींचे संवर्धन करण्यासाठी या भागातील जंगल आणि डोंगरातील माती काढण्यास बंदी आणावी, अशी मागणी या भागातील आदिवासी बांधव करीत आहेत.

भाज्यांमध्ये औषधी गुणधर्म

पहिला पाऊस पडला की डोंगराळ भागात रान माथ्याला ज्या भाज्या तयार होतात, त्याना रानभाज्या असे म्हटले जाते. या भाज्यांची चव अनोखी तसेच त्यात औषधी गुणधर्म असल्यामुळे या भाज्यांच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसतो. यामध्ये कुलू, अंबाडी, शेवळ, टाकला, भारंगी, कंटोळी आदीसह अन्य रान भाज्याचा समावेश होत असतो.

- भीमाबाई कातकरी, माकडडोरा-चिरनेर
आम्ही पावसाळ्यात रानभाज्या गोळा करण्यासाठी डोंगरात जातो, मात्र दिवसेंदिवस या भागातील डोंगर आणि जंगल कमी होत असल्याने आम्हाला रानभाज्या गोळा करण्यासाठी जास्त वेळ लागतो. कुलू भाजी जुडी 80 रुपयास 3 जुड्या, टाकला, अंबाडी, कुर्डू प्रत्येकी जुडी 10 रुपये, करांदे वाटा 50 ते 70 रुपये, अशा भावाने आम्ही विकतो. कंटोळी 50 रूपये वाटा, शेवळी 100 रुपये 3 जुडी अश भावाने आम्ही विकतो. भाज्या महाग असल्यातरी तरी लोक खरेदी करतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT