MMRDA Navanagar protest Pudhari
रायगड

MMRDA Navanagar protest farmers: तिसरी मुंबई भूसंपादन आदेशाची शेतकऱ्यांकडून होळी

पेण प्रांत कार्यालयावर आंदोलन; प्रकल्प रद्द करण्याची मागणी; 19 हजार हरकती येऊनही जनसुनावणी होत नसल्याने शेतकरी आक्रमक

पुढारी वृत्तसेवा

पेण शहर: एमएमआरडीएतर्फे प्रस्तावित होत असलेल्या नवनगर प्रकल्पाला शेतकऱ्यांनी या अगोदरच कडाडून विरोध दर्शविला असतानाही आज प्रांताधिकारी कार्यालय समोर येथील शेतकऱ्यांनी आंदोलन करत प्रकल्पाच्या आदेशाची होळी केली असून प्रकल्प रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

यावेळी सामाजिक कार्यकर्त्या नंदा म्हात्रे यांनी सांगितले की, या प्रकल्पाविरोधात जवळपास 19 हजार शेतकऱ्यांच्या या अगोदरच हरकती नोंदविल्या असतानाही शासन बळजबरीने हा प्रकल्प शेतकऱ्यांवर लादत आहे.

एकीकडे पेण तालुक्यातील एमएमआरडीए प्रकल्पासाठी जवळपास 88 गावे बाधित होत असून यासाठी भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र शेतकरी या प्रकल्पाला कायम विरोध करत आहे. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देऊन सदरचा एमएमआरडीए प्रकल्प तात्काळ रद्द करावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. या प्रकल्पाच्या आदेशाची होळी शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी कार्यालय येथे केली.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र ठाकूर, सामाजिक कार्यकर्त्या नंदा म्हात्रे, मोहिनी गोरे, सूर्यकांत पाटील, राजन झेमसे, संतोष ठाकूर, हेमंत पाटील, अभिमन्यू म्हात्रे, सी.आर.म्हात्रे, राजेश म्हात्रे, विकास म्हात्रे, जितेंद्र ठाकूर, देवेंद्र कोळी आदिंसह शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने प्रांताधिकारी प्रवीण पवार यांना निवेदन देण्यात आले.

दरम्यान, या प्रकल्पात रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात विस्तार आणि प्रमुख बंदर क्षेत्रांशी जोडणी यांचा समावेश आहे. हा प्रकल्प, महानगरातील वाहतूक कोंडी कमी करणे आणि संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात संतुलित प्रादेशिक विकासाला चालना देणे या उद्देशाने आखलेल्या व्यापक मुंबई 3.0 संकल्पनेचा एक भाग आहे, असे सांगण्यात येते.

एका संबंधित उपक्रमांतर्गत, एमएमआरडीएने नवीन शहर विकास क्षेत्रासाठी एक सहभागी भूसंपादन आराखडा जाहीर केला असून, जमीन मालकांना अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत असे सांगितले जाते. यामध्ये परस्पर संमतीवर आधारित अधिग्रहण, एफएसआय/टीडीआर सारख्या विकास हक्कांद्वारे भरपाई आणि भू-एकत्रीकरण मॉडेल यांचा समावेश आहे.

भूसंकलन यंत्रणेअंतर्गत, जमीन मालकांना साडेबावीस ट्केक विकसित जमीन मिळेल, ज्यामुळे प्रकल्पात त्यांचा सहभाग कायम राहील, असेही शासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र याबाबत शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात हरकती दाखल झाल्या आहेत. त्यावर जनसुनावणी झालेली नाही.

एमएमआरडीए प्रकल्प पेण, पनवेल, उरण या भागातील जवळपास 124 गावांमध्ये होत आहे. यातील पेणमधील 88 गावांचा समावेश आहे मात्र हा प्रकल्प शेतकऱ्यांना फसविणारा असून यामध्ये येथील शेतकऱ्यांनी 19 हजार हरकती नोंदविल्या असूनही जन सुनावणी होत नसल्याने हा प्रकल्प शेतकऱ्यावर अन्याय करणारा आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा आणि त्यांच्या मागणीचा विचार न केल्यास उग्र आंदोलन उभारण्यात येईल.व
- नंदा म्हात्रे, सामाजिक कार्यकर्त्या, पेण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT