Pravin Darekar Pudhari
रायगड

Pravin Darekar | “ज्याचं जळतं, त्यालाच कळतं''; मुंबई–गोवा प्रवासादरम्यान प्रवीण दरेकरांनी व्यक्त केला संताप

सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे महामार्गावरील वाहतूक कोंडीचा फटका

पुढारी वृत्तसेवा

Mumbai Goa Highway Traffic Issues

महाड : मुंबई–गोवा महामार्गावरील रखडलेली कामे आणि सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे पुन्हा एकदा महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. अनेक ठिकाणी भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, या परिस्थितीचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह लोकप्रतिनिधींनाही बसत आहे. भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनाही या वाहतूक कोंडीचा थेट अनुभव घ्यावा लागला.

रायगड जिल्ह्यातील इंदापूर परिसरात मुंबई–गोवा महामार्गावर आमदार दरेकर तब्बल अडीच तास वाहतूक कोंडीत अडकले. रोज या मार्गावरून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना आणि स्थानिक नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी आज स्वतः अनुभवल्याचे त्यांनी मान्य केले.

या संदर्भात प्रतिक्रिया देताना आमदार दरेकर म्हणाले, “ज्याचं जळतं, त्यालाच कळतं. या महामार्गावर रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांचा त्रास आज मला प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला.”

या घटनेनंतर त्यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संदेश पाठवून महामार्गावरील गंभीर स्थितीची माहिती दिल्याचे सांगितले. तसेच, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशीही लवकरच चर्चा करून या प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई–गोवा महामार्गाचे रखडलेले काम लवकर पूर्ण होण्यासाठी आपण स्वतः लक्ष घालणार असून, नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी शासन स्तरावर ठोस उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासनही आमदार दरेकर यांनी दिले.

दरम्यान, महामार्गावरील सततच्या वाहतूक कोंडीमुळे चाकरमानी, पर्यटक, स्थानिक नागरिक आणि व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणावर त्रस्त झाला आहे. वेळेवर प्रवास न होणे, आर्थिक नुकसान, आरोग्याच्या समस्या आणि मानसिक तणाव यांचा सामना नागरिकांना करावा लागत असून, प्रशासन व संबंधित यंत्रणांवर तातडीने निर्णय घेण्याचा दबाव वाढत असल्याचे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT