माथेरान ः भारतीय नौदलातील जवान सूरजसिंग अमरपालसिंग चौहान (वय 33, मूळ जलवाला परस, बीवाणी, राजस्थान) यांचा मृतदेह अखेर आठ दिवसांच्या शोधमोहीमेनंतर कर्जत तालुक्यातील पाली-भूतिवली धरण परिसरातील तातोबा मंदिराच्या मागील खोल दरीत सापडला. साधारण 50 ते 70 फूट खोल दरीत मृतदेह पडलेल्या अवस्थेत होता.
सूरजसिंग चौहान हे मुंबईतील कुलाबा डॉकयार्ड येथील एफटीटीटी विभागात मास्टर चीफ ख-ठ क्लास 2 या पदावर कार्यरत होते. ते 7 सप्टेंबर 2025 रोजी पहाटे घरातून बाहेर पडले आणि त्यानंतर रहस्यमयरीत्या बेपत्ता झाले होते. 8 सप्टेंबर रोजी कफ परेड पोलिस ठाण्यात त्यांची बेपत्ता होण्याची नोंद करण्यात आली होती.
आपले अधिकारी बेपत्ता असल्याने शोध सुरू असताना सहकारी यांना मोबाईल लोकेशन कर्जत तालुक्यातील भिवपुरी रोड रेल्वे स्थानकाजवळील पाली-भूतिवली धरण परिसरात आढळल्याने याबाबत शोधमोहीम नेरळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली होती.
या मोहिमेत भारतीय नौदलाचे जवान, स्थानिक सह्याद्री मित्र माथेरान रेस्क्यू टीमचे वैभव नाईक, एमएमआरसीसी सदस्य तसेच गावकरी स्वयंसेवक सहभागी झाले. पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून अडथळे येत असून ड्रोनच्या मदतीने परिसर तपासला जात होता. अखेर 14 सप्टेंबर रोजी येथील सायकल ट्रेकिंग तरुणाला मृतदेह दरीत असल्याचे दिसून आल्याने ही बाब समोर आली. परंतु अंधारात वाट सापडत नसल्याने मृतदेह कुठे पडला हे पोलिसांना सांगताना सायकल ट्रेकला समजून येत नसल्याने आज सोमवार 15 सप्टेंबर रोजी पोलिसांनी शोध घेतला असता मृतदेह धरणाच्या तातोबा मंदिरामागील दरीत सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. मृत व्यक्तीने घातलेले पावसाळी जॅकेट व पायात बूट अंगावर तसेच होते. मृतदेहाची ओळख सूरजसिंग चौहान यांचाच असल्याचे निश्चित झाले.
अपघात, आत्महत्या की हत्या?
या मृत्यूमागे नेमके कारण काय हे अजून गूढच आहे. हा अपघात आहे की आत्महत्या, की हत्या - यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. चौहान परिसरात एकटेच आल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, ते कुत्र्याशी खेळताना दिसले व त्यानंतर डोंगर चढून गेले होते. सध्या पोलिस व नौदलाचे पथक या प्रकरणाचा सर्व अंगांनी तपास करत असून, परिसरात नागरिकांमध्ये भीती व चर्चेचे वातावरण आहे.