विदेशी पक्ष्यांची नवजननी कोकण किनारपट्टी pudhari photo
रायगड

Foreign birds migration : विदेशी पक्ष्यांची नवजननी कोकण किनारपट्टी

सुमारे 10 ते 15 परदेशी पक्ष्यांचा विणीचा हंगाम कोकण किनारपट्टीत पार पडतो

पुढारी वृत्तसेवा

रायगड ः जयंत धुळप

देशात वर्षभरात वेगवेगळ्या हंगामात साधारण तीनशे ते चारशे प्रकारचे पक्षी परदेशातून स्थलांतर करीत असतात. यामध्ये जास्त स्थलांतर हे हिवाळ्यामध्ये दिसून येते. पाणथळ पक्ष्यांचा यामध्ये जास्त समावेश आहे. अगदी उत्तर ध्रुवीय प्रदेशातून तसेच दक्षिण ध्रुवीय प्रदेशातून पक्षी भारतामध्ये स्थलांतर करून येतात. यातील सुमारे 10 ते 15 परदेशी पक्ष्यांचा विणीचा हंगाम कोकण किनारपट्टीत पार पडतो, अशी माहिती ज्येष्ठ पक्षी अभ्यासक तथा गिधाड संरक्षण व संवर्धन क्षेत्रात गेल्या वीस वर्षापासून कार्यरत “सिस्केप” संस्थेचे संस्थापक प्रेमसागर मेस्त्री यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली.

11,000 किलोमीटर अंतर थेट कापून येणारा “गोडवीत‌’

अलास्का, उत्तर टुंड्रा येथून येणारा “गोडवीत“ नावाचा पक्षी थेट 11,000किलोमीटर अंतर कापून भारतात थेट एका उड्डाणात येतो, तर सहा महिने उत्तर ध्रुव ते दक्षिण ध्रुव प्रवास करून पुन्हा सहा महिने दक्षिण ध्रुव ते उत्तर ध्रुव असा पृथ्वीला गोल प्रदक्षिणा करणारा “ रेड बिल्ड ट्रॉपिकल बर्ड” आपल्या अंदमान निकोबार तसेच लक्षद्वीप बेट समूह येथे पाहायला मिळतो, असे प्रेमसागर मेस्त्री यांनी सांगितले.अनेक समुद्री पक्षी देखील पॅसिफिक महासागर पूर्व आणि पश्चिम प्रदेशाकडील किनाऱ्यालगत प्रवास करतात तर अमुऱ फाल्कन ससाणे, गरुड, बाज, गिधाडे, घारी, घुबड आदी शिकारी पक्षी गणातील प्रजाती भारतात स्थलांतरित होऊन कोकणापासून राजस्थानपर्यंतचा प्रवास करतात.

ब्ल्यू थ्रोट, गप्पीदास, वटवटे, चिमण्या, भारीट, मैना, पाखर्ड्या, धोबी, आम्रपक्षी, शिंजीर, नवरंगी पिट्टा अशा समूहातील पक्षी येतात तर मोठे करकोचे कुटुंबातील पांढरा युरोपियन करकोचा, कांड्या करकोचा, युरेशियन करकोचा, पांढऱ्या मानेचा करकोचा, काळ्या मानेचा करकोचा रायगड जिल्ह्यात पाहायला मिळतो.

कोकणात येणारे स्थलांतरित पक्षी उत्तर गोलार्धातून थंडी टाळण्यासाठी आणि अन्नाच्या शोधात कोकणात येतात. विणीसाठी उन्हाळ्यात कोकणात येणाऱ्या विशेष स्थलांतरित पक्ष्यांमध्ये नवरंग (इंडियन पिट्टा) हा पक्षी पावसाळ्याच्या तोंडावर येतो आणि येथे घरटी करून वीण करतो. त्याच्या सोबतच धोबी (वॅगटेल) या प्रजातीतील काही उपजाती स्थानिक स्थलांतर करून विणीसाठी येतात.

फ्लेमिंगो, सी-गल्स, सँडपायपर, पेंटेड स्टोर्क, नवरंग देखणे हंगामी पक्षी

केवळ हिवाळ्यासाठी स्थलांतर करुन कोकणात येणाऱ्या पक्ष्यांमध्ये फ्लेमिंगो अर्थात रोहित पक्षी पामबीच खाडी, ठाणे खाडी आणि रायगडच्या किनारपट्टीवर मोठ्या संख्येने येतात. गेटवेऑफ इंडिया ते मांडवा या सागरी प्रवासादरम्यान मोठ्या थव्याने दिसणारे सी-गल्स अर्थात कुरुंद हे सागरी पक्षी म्हणून ओळखले जातात आणि समुद्री किनारपट्टीवर आढळतात. सँडपायपर अर्थात तुतारी पक्षी पाणथळाच्या जागी येतात, तर पेंटेड स्टोर्क अर्थात चित्रबलाक हा हंगामी पक्षी मोठ्या पाणथळीच्या जागी मुक्कामी येतो. कोकणच्या विणीच्या हंगामाचा खरा स्टार नवरंग अर्थात इंडिय पिट्टा हा पक्षी मे महिन्याच्या शेवटी येतो आणि त्याचा आवाज कोकणच्या जंगलात घुमू लागतो.

पाणथळ जागा पक्ष्यांचा सुसह्य नैसर्गिक अधिवास

पाणथळ पक्ष्यांमध्ये बदक, राजहंस, करकोचे, बगळे, वंचक, समुद्री गरुड हॅरियर्स, स्टिंटस , प्लोव्हर्स, सँडपायपर्स, बलाक , फ्लेमिंगो, गल्स , टर्न, प्रॅटीनकोल, कर्लीव्ह, व्हिंब्रेल, ऑयस्टर कॅचर, नॉडी, बुबी यांचा समावेश आहे तर अन्य प्रजातींमध्ये ब्राम्हणी डक, नोर्दन पिंटेल, गार्गेनी, कुट्स, शोव्हलार, स्पॉट बिल, ग्रे लेग गूज, बार हेडेड गूज अशा अनेक प्रजातींतील रानबदके आहेत. असे मेस्त्री म्हणाले.

अन्न मुबलक उपलब्ध असल्याने कोकण किनारपट्टीची पसंती

कोकणातील पाऊस कीटकांची संख्या वाढवतो, कोकणात नवजात पिल्लाकरिता विविध कीटक, आणि फळे अशा अन्नाची उपलब्धता असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होते. हे पक्षी कोकणात प्रामुख्याने हिवाळ्यात येतात. महत्त्वाचे म्हणजे, बहुतांश स्थलांतरित पक्षी कोकणात फक्त हिवाळी पाहुणे म्हणून येतात; ते त्यांची वीण म्हणजे घरटी आणि अंडी घालणे हे त्यांच्या मूळ देशांत म्हणजे सायबेरिया, युरोप, लडाख येथे जाऊनच करतात. कोकणची किनारपट्टी आणि खाड्यांमधील कांदळवने पक्ष्यांना सुरक्षित घरटी बांधण्यासाठी उत्तम नैसर्गिक जागा उपलब्ध करुन देतात. आंबा,काजू आदि फळझाडे आणि छोटे मासे, जलचर प्राण्यांमुळे पक्ष्यांना विणीच्या काळात ऊर्जा मिळते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT