म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
आगामी जि.प. व पं.स. निवडणूक कार्यक्रम जाहिर होऊन पाच दिवस झाले आणि विविध पक्षांच्या नेतेमंडळींची मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे. काही वर्षांच्या कालखंडानंतर निवडणुका होत आहेत त्यामुळे राजकीय दृष्ट्या सर्वच पक्षांचे नेते मंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. इच्छुक पदाधिकारी, कार्यकर्ते आपापल्या परीने मोर्चे बांधणी करण्यात व्यस्त आहेत त्यामुळे म्हसळा तालुक्यात जि.प. व पं.स. निवडणुक लढविण्यासाठी कोणाला लॉटरी लागणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
मागील काही दिवसांपासून स्थानिक इच्छूकांनी आपापल्या परीने गणातील गाव वाडी-वस्तीवर भेटी देवून मतदारांकडून किती प्रतिसाद मिळतोय याची चाचपणी करायला सुरुवात केली असून त्या गावातील विश्वासू कार्यकर्ते, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या भेटीगाठी घेवून पक्षाने मलाच उमेदवारी मिळणार आहे असे जाहिरपणे सांगत आहेत. काही स्वयंम इच्छूक उमेदवार तर कार्यकर्त्यांना आतापासूनच जेवणाची मेजवानी देवून पक्षाकडून उमेदवारी मिळाली किंवा नाही मिळाली तरी दोन-चार कार्यकर्ते सोबत घेवून अपक्ष उभे राहून आपण निवडणुकीत पैशांचा पाऊस किती पाडणार आहोत याची चविष्ठ फोडणी देत निवडणुकीच्या वातावरणात रंगत वाढवून कार्यकर्त्यांना खुश करून आपापली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा अशा तिन पक्षांमधे तरुण मोठ्या प्रमाणात विभागल्याने तिन तिघाडा आणि काम बिघाडा अशी काहीशी अवस्था तरुणांची झाली आहे. तर एकीकडे काँग्रेस, शेकाप हे पक्ष तरुणांच्या शोधात असल्याचे चित्र आहे. सर्व पक्षीय प्रस्थापित माजी लोकप्रतिनिधींना डावलून नविन युवा चेहऱ्याना संधी देण्यासाठी पुढाकार घेण्याचे धाडस स्थानिक नेते करतील का...? हा एक चर्चेचा विषय आहे.
राजकारणातील सर्व पक्षीय साहेबांच्या आशीर्वादाने व स्थानिक पक्षश्रेष्ठिच्या कृपेने तालुक्यातील युवकांनी जर ठरविले तर नवे पर्व, युवा सर्व हा अजेंडा राबवून सर्वच पक्षातील युवा कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देता येईल. परंतु जेष्ठांची मर्जी सांभाळण्यासाठी 50 टक्के ज्येेष्ठ व 50 टक्के युवक असाही तोडगा काढता येऊ शकेल आणि यामधे किती निष्ठावान युवकांना उमेदवारी मिळेल हे साहेबांचा आदेशच ठरविल.
तालुक्यातील युवक ज्यांना आपले आयडॉल मानतात व ज्या साहेबांचा आदेश प्रमाण मानतात ते युवकांना आगामी जि.प. व पं. स. निवडणुकांमधे उमेदवारी देवून लोक प्रतिनिधित्व करण्याची संधी देतील का नाहीतर पक्षश्रेष्टींचा आदेश समजून ठेंगा दाखवतील याची जोरदार खमंग चर्चा गावागावात नाक्यानाक्यावर युवकांकडून ऐकायला मिळत आहे.
जि.प. व पं. स.च्या निवडणुकीची धामधूम सुरु असून म्हसळातील दोन जि. प. व चार पं. स.च्या गणातून कोण उमेदवार असणार याकडे लक्ष लागून राहिले असले तरी स्थानिक नागरिक, मतदार आणि मुख्य म्हणजे राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या एकंदरीत बोली भाषेतून नागरिकांना कोणत्याही परिस्थित सहज उपलब्ध असणारा, नेहमी सर्वांच्या सुख दुःखात सहभागी होणारा, वेळ प्रसंगी अडीअडचणीत मदत करणारा, स्थानिक पदाधिकारी यांच्या मधून उमेदवार असावा अशी जोरदार चर्चा सुरु आहे. ग्रामीण भागातील जनतेशी नाळ जुळलेली आहे अशा सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांना निवडणूक लढविण्यासाठी वातावरण अनुकूल असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी ज्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक लढविली आहे त्यांनी यावेळेस आता कुठेतरी थांबून नवीन पदाधिकाऱ्यांना निवडणूक लढविण्याची संधी द्यावी असा ही सूर उमटत आहे. ज्यांनी पक्षासाठी एक निष्ठेने काम केले आहे, पक्षाची ध्येय धोरणे जनतेपर्यत पोहचविण्यासाठी काम केलेले आहे अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळणार आहे की नाही किंवा एखादा कोणीतरी नवखा उमेदवार आणून लादला जातो का...? आणि त्या नावाख्या उमेदवाराचे काम करून त्याला निवडणुकीत जिंकून आणण्यास निष्ठावान कार्यकर्त्यांची निष्ठा पणाला लावून गप्प बसण्यास भाग पाडले जाते का...? हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. एकंदरीत निवडणुकीचे राजकीय वातावरण पाहिले तर अगदी एक दोन दिवसात सर्व चित्र स्पष्ट होईल.