Raigad Rice Crop Damage pudhari photo
रायगड

Raigad Rice Crop Damage : पावसाच्या खंडाने म्हसळ्यात भातपिके धोक्यात

हळव्यासह वरकस जमिनीला फटका; ७२३ हेक्टरने खरीप क्षेत्र घटले

पुढारी वृत्तसेवा

म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर

म्हसळा तालुक्यात यंदा पावसामध्ये पडलेल्या खंडाचा भात पिकाला मोठा फटका बसत असून हळव्या व वरकस जमिनीतील भात खाचरांना भेगा पडून पिके सुकू लागली आहेत तर सखल भागातील भात पिकांची पाने पिवळी पडून काही ठिकाणी करपण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे यंदाच्या भात उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या पिक परिस्थिती अहवालानुसार म्हसळा तालुक्यात मागील पाच वर्षांतील सरासरी खरीप लागवड क्षेत्र २११७ हेक्टर आहे. मात्र यंदा खरीप लागवड क्षेत्र १३९४ हेक्टरवर आले असून तब्बल ७२३ हेक्टरने घट झाली आहे. माकडे, डुकरे व इतर वन्यप्राण्यांकडून होणारे शेतीचे नुकसान तसेच रोजगार व अन्य कामानिमित्त शेतकऱ्यांचे स्थलांतर यामुळे शेती क्षेत्र सातत्याने कमी होत असल्याचे कृषी विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

पावसामध्ये खंड पडल्याने पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असलेल्या हळव्या व वरकस जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी झाला आहे. अनेक ठिकाणी भात खाचरांमध्ये भेगा पडल्या असून रोपे सुकू लागली आहेत. सखल भागातील पिकांनाही पाण्याअभावी ताण निर्माण झाला असून पाने पिवळी पडत आहेत.

पावसाचा खंड आणखी वाढल्यास भात पिकाची वाढ खुंटणे, फुटव्यांची संख्या कमी होणे,लोंबीची वाढ व दाणे भरण्यावर परिणाम होणे आणि अपेक्षित उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. काही भागात पिक पूर्णपणे वाया जाण्याचीही शक्यता आहे. दरम्यान तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांना गावनिहाय क्षेत्रीय पाहणी करून पिक परिस्थितीचा नियमित आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

म्हसळा तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयास कळविण्यात आले असून पिक परिस्थितीवर कृषी विभागाचे बारकाईने लक्ष आहे असे तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय शिंदे यांनी माहिती देताना सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT