Mhasla Bauxite Mining Pudhari
रायगड

Mhasla Bauxite Mining: म्हसळ्याच्या निसर्गसमृद्ध परिसरावर बॉक्साईट मायनिंगचे संकट

२९० एकर जमिनीवर उत्खननाची तयारी; आडी गावासह संपूर्ण विभागाच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर

पुढारी वृत्तसेवा

म्हसळा: म्हसळ्याच्या निसर्गसमृद्ध परिसरावर बॉक्साईट मायनिंगचे संकट घोंगावत आहे. येथे २९० एकर जमिनीवर उत्खननाची तयारी असून आडीसह संपूर्ण विभागाच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्याच्या शेवटच्या टोकाला सावित्री नदीच्या कुशीत वसलेला आडी महाड खाडी परिसर म्हणजे निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेले सौंदर्य.

डोंगररांगा, हिरवीगार वनसंपत्ती, नदी-नाले, शेती आणि निसर्गाशी नाते जोडून जगणारी अनेक गावे, अशी या परिसराची ओळख आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या निसर्गसमृद्ध विभागावर बॉक्साईट मायनिंगचे संकट घोंगावत आहे.

हा प्रश्न केवळ आडी महाड खाडी गावापुरता मर्यादित नसून परिसरातील पाच ते सहा ग्रामपंचायत क्षेत्रांतील अनेक गावांच्या पर्यावरणाशी आणि भवितव्याशी संबंधित आहे.

सुमारे २९० एकर जमिनीवर बॉक्साईट उत्खननाचे काम होणार असल्याची माहिती असून या प्रकल्पाचा भाडेकरार सन २०६६ पर्यंत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या खाणकामाचे परिणाम केवळ आजच्या पिढीला नव्हे, तर पुढील अनेक पिढ्यांना भोगावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे.

आडी महाड खाडी हे तीन वाड्यांनी मिळून बनलेले छोटेसे गाव असून येथील ग्रामस्थ गेल्या अनेक पिढ्यांपासून निसर्गाच्या सान्निध्यात सुखासमाधानाने जीवन जगत आहेत. मात्र, गावाच्या वरच्या टप्प्यातील डोंगराळ भागात होणाऱ्या खाणकामामुळे भविष्यात पावसाळी पाण्याचे प्रवाह, मातीची धूप, जलस्रोत आणि नदी-नाल्यांवर परिणाम होण्याची शक्यता ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

शेजारील कारिवणे आणि धारवली-साखरोने ग्रामपंचायत क्षेत्रात बॉक्साईट मायनिंगसाठी एनओसी देण्यात आल्याने संबंधित भागात खाणकाम सुरू झाले आहे. या परिसरातील भौगोलिक परिस्थिती पाहता त्याचे परिणाम शेजारील गावांवरही होऊ शकतात, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या परिसराला खाणकामाचे केंद्र बनवायचे की त्याचे नैसर्गिक वैभव जपायचे, हा प्रश्न आता संपूर्ण विभागासमोर उभा ठाकला आहे.

जनसुनावणीतही नोंदविलेला विरोध

विशेष म्हणजे आडी-महाड खाडी ग्रामपंचायतीने या प्रकल्पाला सुरुवातीपासून विरोध केला असून कोणतीही एनओसी दिलेली नाही. सन २००८ मध्ये कारिवणे येथे झालेल्या जनसुनावणीतही विरोध नोंदविण्यात आला होता.

आज प्रश्न केवळ खनिज उत्खननाचा नाही, तर संपूर्ण परिसराचा निसर्ग, पाणी, शेती, वनसंपत्ती आणि नागरिकांच्या भवितव्याचा आहे. त्यामुळे संबंधित सर्व ग्रामपंचायत क्षेत्रांतील नागरिकांच्या हरकती आणि चिंता शासनाने गांभीर्याने विचारात घेणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT