म्हसळा: म्हसळा परिसरात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर मैत्रीच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आल्याने शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी म्हसळा पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही आरोपींनी तिच्याशी मैत्री वाढवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे.
तसेच अन्य काही व्यक्तींनीही पीडितेशी गैरवर्तन करून या कथित प्रकाराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप तपासात समोर आला आहे. दरम्यान, प्रकरणात आणखी काही व्यक्तींचा सहभाग असल्याची चर्चा असून, या सर्व संशयितांची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी नागरिकांसह विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
यासाठी कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात पोलिस अधीक्षक योगिता कुटे यांची भेट घेतली. उपविभागीय पोलिस अधिकारी योगिता कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेंद्र जाधव या प्रकरणाचा तपास करीत आहेत.