म्हसळा नगरपंचायतीत होणार राजकीय भूकंप pudhari photo
रायगड

Raigad News : म्हसळा नगरपंचायतीत होणार राजकीय भूकंप

तीन नगरसेवक नॉटरिचेबल; राष्ट्रवादीचे नगरसेवक शिवसेनेच्या गळाला?

पुढारी वृत्तसेवा

म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर

म्हसळा नगरपंचायतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी तीन नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. हे तीन नगरसेवक सध्या नोटरिचेबल आहेत. त्यामुळे म्हसळा नगरपंचायतीत राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

म्हसळा नगर पंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता असताना सुरू झालेल्या पक्षांतराच्या मालिकेमुळे शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. दोन महिन्यांपूर्वी नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्रीमती बशारत यांच्यासह सहा नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी तीन नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यामध्ये माजी उपनगराध्यक्ष पद भूषविलेले तसेच स्थायी समिती माजी सभापती आणि स्वीकृत नगरसेवक यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

संबंधित नगरसेवक कालपासून ‌‘नॉट रिचेबल‌’ झाल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होताच नागरिकांमध्ये खमंग चर्चांना उधाण आले आहे. नगर पंचायतीतील पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांवर पक्षांतर बंदी संदर्भातील प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना आपले पद जाण्याच्या भीतीने नगराध्यक्ष व त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील इतर सदस्यांना फोडण्याचे प्रयत्न सुरू केल्याचा आरोप होत आहे.

खासदार सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांच्या नेतृत्वाखाली म्हसळा नगराचा भरघोस विकास सुरू असताना निवडून आलेल्या नगरसेवकांना काम करण्याची पूर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. असे असतानाही करण्यात आलेल्या पक्षांतरामुळे म्हसळा नगराच्या विकासाला किमान वर्षभर तरी खीळ बसणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष रियाज घराडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, ‌‘पद वाचविण्यासाठी सुरू असलेला हा आटापिटा काही महिन्यांपुरताच मर्यादित असून, अंतिम निकाल जनतेच्या हातात आहे.‌’ तसेच दोन महिन्यांपूर्वी पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांनी आम्ही अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असल्याचे लेखी प्रतिज्ञापत्र खासदार सुनील तटकरे यांना दिले होते अशी माहितीही त्यांनी दिली.

एकीकडे पक्षांतर गट संख्या पूर्ण करण्यासाठी पराकाष्ठेचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे अचानक घडलेल्या या राजकीय उलथापालथीमुळे म्हसळा शहराच्या आगामी विकासकामांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विकासाचा झंझावात सुरू असलेल्या म्हसळा नगरीत राजकीय अस्थिरतेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

दरम्यान, रायगड जिल्ह्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम चालू आहे. याचवेळी म्हसळा नगरपंचायतीतही सुरू झालेल्या राजकीय घडामोडींमुळे जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे.

राजकीय वातावरण तापणार

म्हसळा तालुक्यात सध्या सुरु असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या धामधुमित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी काही अनुकूल नसल्याचे विरोधकांकडून बोलले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT