म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
केंद्र व राज्य शासनाची महत्वाकांक्षी असलेली योजना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना या योजनेंतर्गत नियोजनबद्ध रीतीने काम केले तर खेडोपाड्यातील अनेक गावे, वाड्या, वस्त्या समृध्द होतील अशी योजना आहे. परंतु शासनाच्या या उद्देशावर म्हसळा तालुक्यात मात्र पाणी फेरले गेले असल्याचे दिसून येत आहे. बऱ्याच महिन्यांपासून तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामे ठप्प आहेत.
म्हसळा तालुक्यातील रोजगार हमी योजनेच्या गोंधळलेल्या परिस्थितीवर राज्याचे रोजगार हमी योजना विभागाचे मंत्री भरत गोगावले हे काळजीपूर्वक लक्ष देऊन यातून मार्ग काढतील का..? अशी देखील चर्चा सुरु आहे.
रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात 39 ग्रामपंचायती असून हजारो लोकांची रोजगार हमी योजनेंतर्गत मजूर म्हणून नोंद करण्यात आलेली आहे. ज्या मजुरांनी नोंद केली आहे त्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्यास ग्रामपंचायत स्थरावर ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, ग्रामपंचायत सरपंच व पंचायत समिती, प्रशासकीय अधिकारी म्हणून तालुक्याचे तहसीलदार हे सर्व जण अपयशी ठरत असल्याची वस्तुस्थिती आहे.
बऱ्याच महिन्यांपासून तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामे ठप्प असून कामांना प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे ब्रेक लागला आहे. काही ग्रामपंचायतींचे सरपंच किंवा अन्य कोणीही याबाबत काहीही बोलायला तयार नाहीत. तसेच ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या प्रशासनात रोजगार हमी योजनेच्या विषयी ताळमेळ नसल्याने ‘म्हसळ्यात रोजगार हमी योजनेचा बट्ट्याबोळ‘ उडाला आहे.
महाराष्ट्र शासन व रायगड जिल्हा रोजगार हमी योजना विभाग यांच्याकडून म्हसळा तालुक्यात ठप्प असलेल्या रोजगार हमी योजनेच्या कारभाराची चौकशी व्हावी आणि रोजगार हमी योजनेतून अधिकाधिक कामे सुरू करून तालुक्यातील नोंदणीकृत मजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
मागील काही वर्षात या योजनेंतर्गत तालुक्यात विकास कामे होत होती परंतु दोन वर्षांपासून तालुक्यात गावाच्या किंवा ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक हिताची कामे होत नाहीत. तसेच मागील काही गावांमध्ये केलेल्या कामांचे चुकीच्या पद्धतीने इंजिनिअर व संबंधितांनी रेकॉर्ड मेंटन केल्यामुळे शासनाची फसवणूक झाली असून मग्रारोहयोच्या नियमांची पायमल्ली केलेली आहे. चुकीचे मूल्यमापन केलेल्या प्रकाराने इंजिनिअर व अधिकाऱ्यांचेच हात दगडाखाली अडकलेल्या स्थितीत आहेत. अधिकाऱ्यांनी केलेल्या चुकांचा मजुरांना चांगलाच फटका बसत आहे. गावागावात नोंदणी केलेले मजूर रोजगारापासून वंचित राहत आहेत.
म्हसळा तालुका अतिशय दुर्गम व डोंगराळ भागात वसलेला आहे. अनेक गावे तालुक्याच्या ठिकाणापासून कित्येक कोसो दूर अंतरावर आहेत. रोजगार हमी योजने अंतर्गत लाखो रुपयांची विकास कामे करून गाव, वाडी, वस्त्या समृद्ध करता येतील मात्र स्थानिक पंचायत समिती प्रशासन व ग्रामपंचायती यांच्यात रोजगार हमी योजनेची कामे करण्याबाबत समन्वय नसल्याने रोजगार हमीची कामे होत नाहीत असे नागरिकांचे म्हणणे आहे.
मंत्री लक्ष देतील का?
म्हसळा तालुक्यातील रोजगार हमी योजनेच्या गोंधळेल्या परिस्थितीवर बाजूच्याच महाड तालुक्याचे सुपुत्र आणि राज्याचे रोजगार हमी योजना विभागाचे मंत्री भरत गोगावले हे काळजीपूर्वक लक्ष देऊन यातून मार्ग काढतील का..? अशी देखील चर्चा सुरु आहे.
दरवर्षी ग्रामसभेत रोजगार हमी योजनेतून करण्यात येणाऱ्या विकासकामांचे आराखडे तयार केले जातात परंतु मागील काही वर्षांपासून हे आराखडे कागदावरच राहिले असल्याची परिस्थिती आहे. म्हसळा तालुक्यातील संबंधित यंत्रणेने रोजगार हमीची कामे करण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत जेणेकरून नोंदणी कृत मजुरांना गावागावात रोजगार उपलब्ध होऊन दरडोई आर्थिक उत्पन्न वाढेल.निलेश मांदाडकर, माजी सरपंच - खरसई ग्रामपंचायत, ता.म्हसळा
म्हसळा तालुक्यातील रोजगार हमी योजने संदर्भात जी काही कामे झालेली आहेत किंवा नवीन काही करायची असतील तर त्या संदर्भात पंचायत समिती स्तरावर लवकरच बैठक घेऊन आढावा घेतला जाईल. लाभार्थ्यांच्या काही समस्या असतील तर त्या देखील जाणून घेऊ तसेच संबंधित योजनेच्या लाभार्थ्यांना योग्य माहिती दिली जात नसेल तर त्याची देखील योग्य ती दखल घेऊन पुढील निर्णय घेण्यात येतील.सचिन खाडे, तहसीलदार, म्हसळा तालुका