Matheran water crisis Pudhari
रायगड

Matheran water crisis: माथेरानच्या पाणीबाणीची हॉटेल व्यावसायिकांना झळ; काही उपहारगृहांना लागले टाळे

व्यावसायिकांकडून सुविधांमध्ये कपात

पुढारी वृत्तसेवा

मिलिंद कदम

माथेरानः माथेरानमध्ये पाणीटंचाईने उच्चांक मांडला असून त्याचा थेट फटका येथील हॉटेल व्यवसायिकांना बसू लागला आहे. येथील हॉटेलमधील पर्यटकांना असलेल्या सुविधांमध्ये कपाती सुरुवात झाली आहे. काही हॉटेल बंद होण्याच्या मार्गावर आहेत. याचे महाराष्ट्र जल प्राधिकरण अधिकाऱ्यांना काही देणे घेणे नसून येथील अभियंता मात्र मध्ये इतक्या आणीबाणीच्या वेळी ही फिरकला नसल्याने सर्वत्र संतापाचे वातावरण आहे.

माथेरानमध्ये मे महिन्यामध्ये सर्वात मोठा पर्यटन हंगाम सुरू होतो. तीन ते चार महिने मंदीचे सोसल्यानंतर माथेरानकरांना या हंगामामध्ये दिलासा मिळत असतों परंतु दरवर्षी येथील व्यवसायिकांना मोठ्या पाणीटंचाई सामोरे जावे लागते. यावर्षी तर या पाणीटंचाईने कहर केला असून आता तर व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे .

येथील सर्वात मोठी हॉटेल इंडस्ट्री व मार्केटमध्ये लहान मोठे व्यवसायिक यांना पाणी टंचाई सामोरे जावे लागत असल्याने आपल्या व्यवसाय बंद करावे लागणार आहेत, माथेरानमध्ये सध्या सुरू असलेल्या या पाणीटंचाई बाबत शासनाकडून कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने ही समस्या अधिकाधी जटिल होऊ लागली आहे.

अनेक दिवसांपासून नेरळ वरून येणारे पाईप लाईन पंपिंग स्टेशन सातत्याने बंद पडत आहेत, अधिकाऱ्यांकडून हेच बंद पडलेले पंप दुरुस्त करून चालू करण्यात येतात व दोन ते तीन तासांनी पुन्हा बंद पडतात ही मालिका गेल्या पंधरा दिवसापासून सुरू आहे त्याचा फटका माथेरानकर सोसत आहे.

शनिवार -रविवार माथेरान मध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक आले होते व या दोन दिवसांमध्ये पाण्याचा खेळ सुरू झाल्यामुळे अनेक हॉटेलधारकांना आपला व्यवसाय मुकावे लागले आहे.

अधिकारी कोणती ही ठोस उपाय योजना करीत नसल्याने हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. यापासून मुक्तता करण्यास माथेरानकरांना आपत्कालीन परिस्थिती म्हणून टँकरने पाणीपुरवठा करण्यात परवानगी मिळावी,अशी मागणी जोर धरत आहे.

माथेरानमध्ये नैसर्गिक जलस्तोत्र पुन्हा पुनर्जीवीत करून त्याचे सोशल करून पिण्यायोग्य पाणी उपलब्ध व्हावे. माथेरान शार्लेट लेक ची स्वच्छता करून गाळ उपसा केल्यास पाणी साठवणूक क्षमता वाढेल. सिमसन टँक या तलावाचे विस्तारीकरण करून हे पाणी माथेरान साठी पिण्या योग्य करून वापर करावा. नेरळ माथेरान जलवाहिनी वरील अनधिकृत जोडण्या तत्काळ काढल्या जाव्यात जेणेकरून पाणी पुरवठा सुरळीत होईल.असा अंदाज व्यक्त केला आहे.

शार्लेट लेकने गाठला तळ

शार्लेट लेक तलावाने तळ गाठला असून आता फक्त गाळच उरल्याने ही पाणी पिण्यायोग्य नाही,मधल्या काळात नियोजन शून्य कारभारामुळे मोठ्या प्रमाणात पाणी उपसा करताना नेरळ माथेरान जलवाहिनीचे दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.

आधी गॅस सिलेंडर नव्हते तेव्हा किचन बंद आत्ता हॉटेलच बंद करुन गाव सोडायची वेळ नको यायला, पाणीप्रश्न अधिक गंभीर स्वरूप धारण करीत आहे. त्याकरिता राजकीय पाठिंबा हवा तरच हा प्रश्न मार्गी लागेल.
- रेखा चौधरी,हॉटेल व्यवसायिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT