माथेरान : जानेवारी महिन्यात सलग लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे बहरलेल्या माथेरान मध्ये पर्यटकांची संख्या कमी झाली असून त्यामुळे येथील हात रिक्षा चालक, कुली,लहान व्यवसायिक तसेच हॉटेल व्यवसायावर याचा मोठा परिणाम झाल्याचे दिसत असून येणारे दोन-तीन महिने परीक्षेचा काळ असल्याने व्यावसायिकांची चिंता वाढली आहे
सध्या माथेरानच्या रस्त्यांवर शुकशुकाट असल्याने येथील व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे,माथेरानमध्ये वीज व पाणी दर जास्त आहेत त्यामुळे ही बिले भरताना येथील व्यवसायिकांनी तारेवरची कसरत करावी लागत असते. आता येणाऱ्या काळामध्ये मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू होत असल्याने त्याही काळात माथेरान मध्ये पर्यटक खूप कमी प्रमाणात असतात त्यामुळे हा मंदीचा काळ खूप मोठा असणार आहे,
हाजी मलंग येथे सुरू झालेल्या फेन्यकुलर रेल्वेमुळे ही माथेरानमध्ये पर्यटकांची संख्या घटल्याचे बोलले जात आहे, वनी, हाजी मलंग गड, व माथेरान हे तीन प्रकल्प एकाच वेळेस सुरू झाले होते परंतु राजकीय हस्तक्षेपामुळे माथेरानचा फेन्युक्युलर रेल्वे प्रकल्प गुंडाळला गेला होता आज जर का हा प्रकल्प सुरू असताना तर माथेरान थेट पनवेल विमानतळाशी जोडले गेले असते त्याचप्रमाणे प्रस्ताविक तिसरी मुंबई या महामार्गाशी थेट जोडले जाणार होते माथेरानच्या पर्यटन विकासावर अशाच प्रकारे अनेक वेळा बाहेरील लोकांच्या हस्तक्षेपामुळे माथेरान हे अनेक पर्यटन पूरक विकास कामांना मुकला आहे.
येथील सर्वात मोठा रोपवे प्रकल्पही अधांतरी आहे हा प्रकल्प सुरू झाल्यास माथेरान चे पर्यटन ही वाढेल. माथेरानच्या अनेक समस्या सोडविण्यास शासन अपयशी ठरत आहे ज्यामध्ये मुख्यत्वे नेरळ माथेरान घाट रस्ता, नेरळ माथेरान मिनी ट्रेन संख्येत वाढ, पार्किंग व्यवस्था, माथेरान शहरांमध्ये सुरू असलेल्या रिक्षा वाढीबाबत सातत्याने विलंब अशासारख्या अनेक कारणांमुळेही माथेरान मधील पर्यटकांची संख्या कमी होऊ लागली आहे.